मुंबई, ठाणे व पुणे मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये बराच गोंधळ असून लाखो मतदारांची नावे काढून टाकण्यात आलेली आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी घरोघरी जाऊन या ठिकाणी नवीन मतदार याद्या तयार करण्यात याव्यात, अशी मागणी ज्येष्ठ भाजप नेते राम नाईक यांनी केली आहे.
मुंबई शहर व उपनगर जिल्ह्य़ात २००९ ते २०१४ या काळात वाढलेल्या मतदारांची संख्या १८ लाख ९३ हजार असून, कमी केलेल्या मतदारांची संख्या १६ लाख २३ हजार आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर नावे काढून टाकताना मतदाराला नोटीस देणे, तो न भेटल्यास पंचनामा करणे, मतदार यादीत ज्यांची छायाचित्रे नाहीत ती मिळविणे, हे काम काळजीपूर्वकपणे झालेले नाही. त्यामुळे या सदोष याद्या काढून टाकून घरोघरी जाऊन नवीन मतदार यादी तयार करणे आवश्यक असल्याचे नाईक यांनी सांगितले. मतदार याद्यांतील चुकांचा मुद्दा केंद्रीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे अनेकदा उपस्थित करूनही सुधारणा झाल्या नाहीत. उत्तर मुंबईच्या मतदार यादीत २० टक्के मतदारांची नावे दुबार असल्याचे २००८ मध्ये केंद्रीय निवडणूक आयुक्तांना दाखवून दिले होते. पण तरीही याद्यांमधील चुका कायम असल्याने आता मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस. संपत यांना पुन्हा पत्र पाठवून ही मागणी केल्याचे नाईक यांनी सांगितले.

Story img Loader