भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे अतिशय मेहनती असून ते आपले चांगले मित्र असल्याची स्तुतिसुमने द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत उधळली आहेत. तथापि, निवडणुकीनंतर भाजपशी आघाडी करण्याबाबत करुणानिधी यांनी वक्तव्य करण्याचे टाळले आहे.
मोदी हे निवडणुकीचा अविश्रांत प्रचार करीत आहेत त्यावरून ते मेहनती असल्याचे सिद्ध होते आणि ते आपले चांगले मित्रही आहेत, असे करुणानिधी म्हणाले. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांबाबत आपले वैयक्तिक मत काय, असे विचारले असता करुणानिधी यांनी सदर मत व्यक्त केले.
अलीकडेच झालेल्या द्रमुकच्या परिषदेत पक्ष कोणत्याही जातीयवादी पक्षाशी युती करणार नाही, असे वक्तव्य आपण केले होते. हा जातीयवादी पक्ष म्हणजे भाजप आहे का, असे विचारले असता करुणानिधी काहीसे संतप्त झाले. भाजप जातीयवादी आहे, असा कबुलीजबाब आपण घेत आहात का, असा प्रतिप्रश्नच करुणानिधी यांनी संबंधित प्रतिनिधीला विचारला.
निवडणुकीनंतर द्रमुक भाजपप्रणीत आघाडीत सहभागी होणार का, असे विचारले असता करुणानिधी यांनी आपण सध्या कोणतेही भाकीत वर्तवू शकत नसल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीनंतर काय परिस्थिती असेल त्याची कल्पना नाही, असेही द्रमुकचे नेते म्हणाले.
भाजप आणि काँग्रेससमवेत कोणतीही आघाडी करण्याची शक्यता दोन महिन्यांपूर्वीच फेटाळणाऱ्या करुणानिधी यांनी आता मोदींबाबत केल्याने त्याला महत्त्व दिले जात आहे. मात्र ते करुणानिधी यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगून पक्षाचे संघटन सचिव टीकेएस इलनगोवन यांनी या भाष्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
पासवान यांच्यापाठोपाठ द्रमुकही रालोआत?
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे अतिशय मेहनती असून ते आपले चांगले मित्र असल्याची स्तुतिसुमने द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत उधळली आहेत.
First published on: 01-03-2014 at 02:12 IST
TOPICSनरेंद्र मोदीNarendra ModiलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
+ 1 More
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp dmk to form alliance karunanidhi praises narendra modi