जुन्या मित्रांना विसराल, तर डोक्यात धोंडा पाडून घ्याल… शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून कानउघडणी करण्यात आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने या विषयावर सबुरीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने केलेली कानउघडणी म्हणजे मित्रत्वाच्या नात्याने दिलेला सल्ला असल्याचा साक्षात्कार भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांना झाला आहे.
नितीन गडकरी आणि राज ठाकरे या दोन नेत्यांमधील भेटीनंतर भाजप आणि मनसे या दोन पक्षांमधील वाढती सलगीमुळे शिवसैनिक अस्वस्थ आहेत. उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच भाजपला दोन डगरींवर पाय ठेवून न चालण्याचा इशारा दिला होता. त्याचबरोबर महाराष्ट्र भाजपमधील निर्णय़ घेण्याचे अधिकार कोणाला आहेत, असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी विचारला होता. यानंतर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी करून त्यांच्याशी चर्चा केली होती. त्याचबरोबरचे भाजपचे महाराष्ट्र प्रभारी राजीवप्रताप रुडी हेदेखील उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. एवढं सगळं केल्यानंतरही उद्धव ठाकरे यांच्या मनातील अविश्वासाचे मळभ अद्याप दूर झालेले नाही. त्यामुळेच त्यांनी गुरुवारी पुन्हा एकदा सामनातील अग्रलेखातून भाजपवर टीका केली.
त्या पार्श्वभूमीवर जावडेकर म्हणाले, भाजप आणि शिवसेनेने दोघांमधील वादाचे विषय मिटवले आहेत. सध्या दोन्ही पक्षांमध्ये अजिबात अविश्वासाचे वातावरण नाही. शिवसेना आणि भाजप नैसर्गिक मित्र असून, महाराष्ट्रात विजय मिळवण्यासाठी आम्ही एकत्रितपणे लढू आणि ३५ पेक्षा जास्त जागा नक्कीच जिंकू. सामनामध्ये लिहिलेला अग्रलेख मी वाचला आहे. त्यामध्ये शिवसेना आणि भाजपमधील अनेक वर्षांच्या मैत्रीची उदाहरणे देण्यात आले आहेत. माझ्यामते शिवसेनेने भाजला मित्रत्वाच्या नात्याने सल्ला दिला असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.

Story img Loader