‘आयटम गर्ल’ आणि कलाबाह्य़ कारणांसाठी चित्रपटसृष्टीला अधिक परिचित असलेली राखी सावंत आता निवडणुकीच्या िरगणात उतरल्याने, उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील लोकसभा निवडणूक बहुरंगी होणार आहे. आपण भाजपची बेटी आहोत, असे काही दिवसांपूर्वी दिल्लीत अभिमानाने सांगणाऱ्या राखीला पक्षाची उमेदवारी मात्र मिळालीच नाही, त्यामुळे अपक्ष लढविण्याचे राखी सावंतने बुधवारी सांगितले. यापुढे चित्रपटात ‘आयटम गर्ल’ म्हणून काम न करण्याचा निर्णयही राखीने घेतला आहे.
दोन आठवडय़ांपूर्वीच राखी सावंतने नवी दिल्लीत भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते. राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी राखीचा घरगुती पाहुणचारही झाला, इतकेच नव्हे, तर राजनाथ सिंह यांनी बेटी अशा शब्दांत राखीचा उल्लेख केल्यामुळे ती भारावूनही गेली होती. आता मी भाजपची बेटी झाले आहे, मला आई, वडील, भावंडेही मिळाली आहेत, असे अभिमानाने सांगून राखी दिल्लीतून मुंबईत परतली. त्यानंतर उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध होऊ लागल्या. भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी राखी सावंतचे प्रयत्नही सुरू होते. मात्र, ती राहत असलेला मतदारसंघ शिवसेनेच्या वाटणीला गेला. आपला स्वत:चा पक्ष स्थापन करण्याचाही राखीचा विचार असून ‘हिरवी मिर्ची’ हे त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असावे यासाठी तिचे प्रयत्न असल्याचे समजते. मात्र, त्याला दुजोरा मिळू शकला नाही. अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या राखी सावंतचा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनाच पाठिंबा असेल, असे सूत्रांनी सांगितले.
पंचरंगी लढत
या मतदारसंघात भाजप-सेना-रिपाइं महायुतीचे गजानन कीर्तिकर, काँग्रेसचे गुरुदास कामत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महेश मांजरेकर आणि आम आदमी पार्टीचे मयांक गांधी यांच्यात होणारी लढत आता राखीच्या उमेदवारीमुळे पंचरंगी होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा