भाजपमध्ये ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारण्यावरून नाराजी निर्माण झालेली असतानाच, पक्षात कोणतेही मतभेद नसल्याचा दावा ज्येष्ठ नेते वेंकय्या नायडू यांनी केला आहे. तसेच ज्येष्ठांना बाजूला सारण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगितले.
भारतीय राजकारणातील महनीय व्यक्तिमत्त्व असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांना बाजूला सारण्याचा विचार कोण कसा करू शकते, असा सवाल नायडूंनी केला. ते आम्हाला मार्गदर्शन करत राहतील, असे नायडूंनी स्पष्ट केले. अडवाणी यांनीच गांधीनगर मतदारसंघाला पसंती दिली आहे. पक्षाने त्यांच्यापुढे पर्याय ठेवले होते, असा दावा नायडू यांनी केला. भाजपला विजयाची संधी असल्याने अनेक इच्छुक आहेत. त्यामुळे ज्यांना उमेदवारी मिळणार नाही ते नाराज होणे स्वाभाविक आहे. जसवंत सिंह हेदेखील उमेदवारी न मिळाल्याने संतापले आहेत. पक्षहिताला बाधा पोहोचेल असे वर्तन ते करणार नाहीत, अशी अपेक्षा असल्याचे नायडू यांनी सांगितले. पक्षाने त्यांना खासदार आणि मंत्रिपदही दिले. त्यामुळे त्यांना बाजूला सारण्याचा प्रश्नच नाही. उमेदवार निवडीत मोदींचा हस्तक्षेप नाही, असा दावाही नायडूंनी केला. एखादा व्यक्ती नव्हे, तर पक्ष उमेदवार निवडतो. मोदी क्वचितच त्यामध्ये सल्ला देतात. तुमचे मत असू शकते, मात्र एकदा निर्णय झाला तर त्याचा आदर करायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुरली मनोहर जोशींनी पक्षाने वाराणसीऐवजी दुसरीकडून लढण्यास सांगितले. पक्ष जेव्हा एखादा निर्णय घेतो तेव्हा तो सर्वानी मान्य करायला हवा, असे नायडूंनी सांगितले.
निकालानंतर अण्णा द्रमुकचा पाठिंबा घेण्याची गरज आम्हाला भासणार नाही, असे एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. मात्र एखाद्याला पाठिंबा द्यायचा असेल तर तो भाग वेगळा. भाजप सत्तेवर आल्यावर आधार कार्ड योजनेचा फेरविचार करू, असे आश्वासन दिले.
जसवंत सिंह आज अपक्ष अर्ज भरणार
नवी दिल्ली : भाजपमध्ये तिकीट नाकारण्यात आल्याने नाराज असलेले ज्येष्ठ नेते जसवंत सिंह हे सोमवारी बारमेर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार आहेत. जसवंत सिंह यांनी सांगितले, की मी काही इकडेतिकडे सरकवून हवे तसे करायला टेबल, खुर्ची नाही, तडजोडीच्या राजकारणावर आपला विश्वास नाही. आपण दुसऱ्या कुठल्याही पक्षात जाणार नाही. काँग्रेसने काही स्वप्ने पाहू नयेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा