लोकसभा निवडणुकीतील मतविभागणी टाळण्यासाठी भाजपचे नेते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मनधरणी करत असतानाच, लवकरच होत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये मनसेने आपला उमेदवार उभा करू नये, यासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे व मुंबई भाजपचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी शुक्रवारी राज ठाकरे यांनी त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. नितीन गडकरी यांच्या ‘राज भेटी’वरून शिवसेनेत प्रचंड नाराजी असतानाच भाजपने पुन्हा एकदा मनसेला मदतीची हाक देऊन शिवसेना नेतृत्वाला ‘वाकुल्या’ दाखवल्या आहेत. भाजपचे मनसेशी ‘सूत’ जुळल्यास विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या एका उमेदवाराचा पराभव होण्याची चिन्हे आहेत.
भाजपला दोन उमेदवारांच्या विजयासाठी ११ मतांची गरज आहे. या पाश्र्वभूमीवर तावडे व शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. प्रस्तावित तिसऱ्या आघाडीने या निवडणुकीत उमेदवार न देता मनसेने आपली मते भाजप उमेदवारांना देण्याची गळ तावडे यांनी राज ठाकरे यांना घातली. शेकापचे जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांची तीन मते भाजपने मागितली आहेत. जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे, अबू आझमी, आणि अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याकडील अतिरिक्त मते भाजप उमेदवाराला मिळावीत, यासाठीही भाजप प्रयत्न करणार आहे. राज ठाकरे यांचा निर्णय शनिवारी अपेक्षित असल्याचे तावडे यांनी सांगितले. भाजपचे दोन आमदार निवडून आणण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची मते फोडण्याचीही ‘तयारी’ सुरू आहे.
संख्याबळाच्या आणि रणनीतीच्या बळावर शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराच्या तुलनेत आपला दुसरा उमेदवार विजयी होण्याची शक्यता अधिक आहे, असे भाजपच्या नेत्यांना वाटते. त्यादृष्टीने भाजपकडून आक्रमकपणे राजकीय गणिते आखली जात आहेत. तिसऱ्या आघाडीने आणखी उमेदवार न देता अन्य पक्षांनी आपली मते भाजप उमेदवाराला द्यावीत, ही भूमिका मनसेला पटल्यास भाजप उमेदवाराचा विजय सोपा आहे, असे एका भाजप नेत्याने सांगितले. त्यामुळे शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला निवडून येता येणार नाही. विधानपरिषदेच्या २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे अनिल परब यांचा पराभव झाला होता. त्याची पुनरावृत्ती यंदा होणार असल्याचे या नेत्याने सांगितले.
तावडेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने दुसरा उमेदवार देताना भाजपला विचारात घेतले नाही, असा हल्लाबोल करीत, शिवसेनेने एकच उमेदवार दिला असता तर निवडणूक बिनविरोधच झाली असती, असे मत विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी व्यक्त केले. रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांना शिवसेनेने महायुतीत आणले, मात्र त्यांच्यासाठी राज्यसभेची जागा भाजपने दिली. त्यासाठी ज्येष्ठ भाजप नेते प्रकाश जावडेकर यांना उमेदवारी देता आली नाही. त्याची जाण ठेवून शिवसेनेने दुसरा उमेदवार देताना विचार करायला हवा होता, असे तावडे म्हणाले.
पुन्हा ‘राज’मार्गावर!
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी शुक्रवारी राज ठाकरे यांची भेट घेतली.
विधान परिषदेची जुळवाजुळव
भाजप विधानपरिषदेच्या दोन जागा लढविणार असून २९ मतांचा कोटा आहे. भाजपकडे ४७ मते असून दोन उमेदवारांच्या विजयासाठी ११ मते कमी पडतात. तर शिवसेनेला दुसऱ्या उमेदवारासाठी १२ मते कमी पडतात. मनसेकडे ११, शेकापकडे ४, अबू आझमींकडे २, जनसुराज्य पक्षाकडे २ आणि दोन-तीन अपक्षांची मते प्रस्तावित तिसऱ्या आघाडीसोबत आहेत.
तावडे आणि फुंडकरांना पुन्हा उमेदवारी?
तावडे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पण भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी होण्यासाठी अतिरिक्त मते मिळविण्याची खात्री झाल्यावरच उमेदवारी कोणाला द्यायची, याचा निर्णय शनिवारी घोषित होईल, असे तावडे यांनी सांगितले. मात्र तावडे व फुंडकर यांना दोन वेळा विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली आहे. फुंडकर हे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्ती मानले जातात. त्यांना उमेदवारी दिल्यास तावडे यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
भाजपच्या शिवसेनेला ‘वाकुल्या’
लोकसभा निवडणुकीतील मतविभागणी टाळण्यासाठी भाजपचे नेते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मनधरणी करत असतानाच, लवकरच होत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये मनसेने आपला उमेदवार उभा करू नये,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-03-2014 at 03:40 IST
TOPICSभारतीय जनता पार्टीBJPराज ठाकरेRaj Thackerayलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
+ 1 More
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leaders meet raj thackeray seek support for council polls