सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांवरील अन्याय कदापिही सहन करणार नसून भाजप खासदारांनीही संसदेत कर्नाटक सरकारविरोधी भूमिका मांडली होती. शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी उगाच भाजपवर आरोप करू नयते, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. आपणच जर भांडत बसलो, तर अन्य फायदा घेतील. मराठी भाषिकांविरोधातील अन्यायाविरोधात आपण सर्वानी एकत्रितपणे उभे राहिले पाहिजे, असे तावडे यांनी स्पष्ट केले.
वादग्रस्त सीमावर्ती भाग केंद्रशासित करण्यात यावा, या शिवसेनेच्या मागणीला भाजपचा पाठिंबा आहे, असे सांगून तावडे म्हणाले, हे करण्यात तांत्रिक  अडचणी आहेत. पण मराठी भाषिकांवर कोणताही अन्याय होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारच्या अत्याचारांविरोधातील मुद्दा भाजपचे संजय काका पाटील यांनी शून्य प्रहरात लोकसभेत उपस्थित केला होता आणि अन्य काही खासदारांनी त्याला पाठिंबा दिला होता. भाजपच्या खासदारांनी समर्थन न दिल्याचे शिवसेनेचे रावते यांनी सांगितले. पण आपण आपसांत आरोप करीत बसलो, तर अन्य कोणी फायदा घेईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले. कर्नाटकमधील भाजप खासदार प्रल्हाद जोशी यांच्याशीही माझे बोलणे झाले असून त्यांनीही पोलिसी अत्याचारांचांच्या बाजूने भूमिका घेतलेली नाही, असे तावडे यांनी शासकीय विश्रांतीगृहात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राज्य सरकारच्या अनेक मंत्र्यांनी केलेल्या सिंचन गैरव्यवहारासह  भ्रष्टाचारांच्या अनेक प्रकरणांची सत्तेत आल्यावर विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी करण्यात येईल, असे सांगत टोलमुक्तीसाठी महायुती कटिबध्द असल्याचे स्पष्ट केले. टोलमुक्ती साध्य करण्यासाठी बाँड किंवा अन्य माध्यमातून निधी उभारणीचा पर्याय अजमावला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

Story img Loader