भाजपमध्ये ‘आयाराम’ आणि अन्य पक्षीयांसाठी ‘लाल गालिचा’ अंथरला जात असून लोकसभेची उमेदवारी बहाल केली जात आहे, तर अनेक वर्षे पक्षाचे एकनिष्ठपणे काम केलेल्यांचा मात्र विचार होत नाही आणि त्यांच्या हाती केवळ ‘घोंगडी’ दिली जात आहे, याबद्दल पक्षातील काही जुन्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. या लोकसभेसाठी भाजप राज्यात लढवीत असलेल्या जागांपैकी २५ टक्के जागा ‘आयाराम’ आणि अन्य पक्षीयांना बहाल करण्यात येत आहेत.
यापूर्वी भाजप हा एकनिष्ठ कार्यकर्त्यांची मजबूत फळी असलेला पक्ष यासाठी ओळखला जात असे. अजूनही काही जुन्या कार्यकर्त्यांच्या जोरावर पक्ष टिकून आहे. मात्र नवीन कार्यकर्त्यांची जी फौज पक्षात दाखल होत आहे आणि त्यांचे स्वागत करून उमेदवारी बहाल केली जात आहे, त्यामुळे पक्षाशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते मात्र नाराज आहेत. भाजप राज्यात २८ तर शिवसेना २२ जागा लढवीत असून त्यापैकी बारामती व माढा या दोन जागा महायुतीतील मित्रपक्षांसाठी भाजपने सोडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या डी.बी. पाटील यांना नांदेडमधून तर संजय पाटील यांना सांगलीतून उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवसेनेतून आलेल्या सुभाष भामरे यांना धुळ्यातून उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या कपिल पाटील यांना भिवंडीतून उमेदवारी दिली जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्या कन्या हीना गावीत भाजपच्या वाटेवर असून त्यांचा पक्षप्रवेश बुधवारी होण्याची शक्यता आहे. त्यांना नंदूरबारमधून उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे ‘आयाराम’ आणि अन्य पक्षांसाठी भाजप लोकसभेच्या ७ जागा देत आहे. पक्षात योग्य उमेदवार किंवा ‘वजनदार’ नेते नाहीत, यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे का, अशी चर्चा पक्षाच्या जुन्या नेत्यांमध्ये आहे.
अभाविपच्या माजी पदाधिकाऱ्यांचा
बापट यांना विरोध!
नवी दिल्ली : माजी भाजपाध्यक्ष नितीन गडकरी व लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांच्यातील शीतयुद्ध अभाविपच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे भडकले आहे. गडकरी यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून आमदार गिरीश बापट यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला असताना पुण्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी त्यास विरोध केला आहे. अभाविपच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या चमूने बापट यांच्याऐवजी मराठा उमेदवारास उमेदवारी देण्याची मागणी थेट पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्याकडे केली. पश्चिम महाराष्ट्रात मराठा नेतृत्व नसल्याने पुण्यात हा प्रयोग करता येईल, असा दावा या चमूने राजनाथ सिंह, संघटन सहसचिव व्ही. सतीश यांच्याशी बोलताना केला.
बुधवारी उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता असताना एरवी गडकरी समर्थक मानल्या जाणाऱ्या अभाविपच्या माजी पदाधिकाऱ्यांनी बापट यांना विरोध दर्शवला आहे. मुंडे-गडकरी वादामुळे ‘परिवारा’तील ज्येष्ठ सदस्यांनी पुण्याची उमेदवारी निश्चित केली आहे; परंतु काँग्रेसने मराठा उमेदवारास मैदानात उतरवले तर बापट यांचा निभाव लागणार नाही. शिवाय पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मराठा नेतृत्व नाही. मुंडे-गडकरी वादामुळे पुण्याचा निर्णय रेंगाळला. त्याचाही फटका बसेल. तीन वेळा आमदार असलेल्या बापट यांना लोकसभेत धाडण्याऐवजी अन्य पदाधिकाऱ्याला संधी द्यावी. अर्थात, पक्षाचा निर्णय काहीही असला तरी आम्हाला तो मान्य असेल, असेही त्यानी नमूद केले.