महाराष्ट्रात महायुती म्हणून लढताना देशातील अन्य राज्यांत स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची आणि अडवाणी यांना सहानुभूती दाखवत नरेंद्र मोदींवर ‘धनुष्यबाण’ ताणायचा या शिवसेना नेतृत्वाच्या ‘रोखठोक’ भूमिकेमुळे भाजपच्या नेत्यांमध्येच नव्हे, तर कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे. जी सहानुभूती अडवाणी यांना दाखविण्यात येते, ती ज्येष्ठ सेना नेते मनोहर जोशी यांना का दाखवली जात नाही, असा सवाल करीत भाजपच्याच एका नेत्याने सेनेची कोंडी केली आहे.
गेल्या काही महिन्यांत महायुती भक्कम असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जाहीरपणे सांगत असताना त्यांच्याच मुखपत्रातून मात्र सातत्याने भाजपवर, त्यातही नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेनेच्या मुखपत्रातून बाणांचा मारा सुरू आहे. किमान लोकसभा निवडणुकीच्या लढाईला तोंड फुटल्यानंतर तरी हे थांबेल अशी अपेक्षा असताना भाजपअंतर्गतच्या बाबींमध्ये नाक खुपसणे अयोग्य असल्याचे मत या भाजप नेत्याने व्यक्त केले. ‘भाजपमध्ये मोदी युग असले तरी अडवाणी युगाचा अस्त झालेला नाही’ हे ‘मार्मिक’ भाष्य करण्यापूर्वी शिवसेनेत ज्येष्ठांचा किती मान राखला गेला तेही तपासून पाहावे, असेही या नेत्याने सांगितले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मनोहर जोशी यांना ज्या पद्धतीने अवमानित करण्यात आले तसेच त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभेची उमेदवारीही नाकारण्यात आली. अडवाणी हे सातत्याने गुजरातमधील गांधीनगरमधून निवडणूक लढवीत असताना त्यांना तेथूनच उमेदवारी देण्यात काय अयोग्य केले, असा सवाल करत जोशींसारखे त्यांना उमेदवारी नाकारली तर नाही ना, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेच्या मुखपत्रातून सातत्याने कोणत्या तरी निमित्ताने नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे होत असलेल्या टीकेची दखल घेऊन यापूर्वीही नरेंद्र मोदी यांनीही उद्धव यांच्याशी संवाद साधला होता. मात्र आता अडवाणींच्या निमित्ताने पुन्हा करण्यात आलेला हल्ला राज्यातील भाजप नेत्यांना कमालीचा अस्वस्थ करून गेल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शिवसेनेतून एकापाठोपाठ एक खासदार व पदाधिकारी का बाहेर पडत आहेत, तेही एकदा ‘रोखठोक’पणे सांगितले तर बरे होईल, अशी ‘मार्मिक’ टिप्पणीही या नेत्याने केली.