भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी ते माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यापर्यंत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांवर तारतम्य सोडून शिवसेना नेतृत्वाकडून होत असलेल्या टीकेला लोकसभा निवडणुकीनंतर ‘रोखठोक’ उत्तर देण्यात येणार आहे. मात्र सद्यस्थितीत शिवसेनेचे ‘लोढणे’ वाहण्याची भूमिका भाजपने घेतली आहे.
‘आपण बाळासाहेब नाही’, असे उध्दव ठाकरे यांनी अनेकदा सांगितले आहे, मात्र त्यांच्या थाटात भाजपवर टीका करण्याचे काम मात्र ते ‘मार्मिक’ पणे करीत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला ‘कमळाबाई’ म्हणून केलेली टीका भाजपने सहन केली. त्यांचा रालोआतील अधिकार व नेतृत्व भाजपला मान्य होते. मात्र उध्दव ठाकरे यांनी ‘व्यापारी’ म्हणून गडकरींच्या केलेल्या संभावनेला भाजप ‘मनसे’ झटका दिल्याशिवाय राहणार नाही, असे ज्येष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले. पण लोकसभा निवडणुकीत बहुमत गाठायचे असल्याने तोंड दाबून बुक्क्य़ाचा मार भाजप नेते सध्या सहन करीत आहेत. ही निवडणूक पार पडल्यावर शिवसेनेबाबत कटू निर्णय घेण्याची तयारीही भाजप नेत्यांनी ठेवली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांच्या वेळी शिवसेनेची विरोधी भूमिका भाजपने सहन केली. प्रतिभाताई पाटील यांच्यावेळी शिवसेनेने ‘मराठी बाणा’ दाखविला, तर प्रणव मुखर्जी यांच्यासाठी ‘स्वतंत्र मार्ग’ निवडला, पण भाजपचा ‘राज’ मार्ग मात्र उध्दव यांना झोंबतो. त्यांनी ‘टाळी’ मागितली तर चालते, असे वरिष्ठ भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.

Story img Loader