उत्तर-मध्य मुंबईतून अखेर पूनम महाजन यांना भाजपने उमेदवारी दिली असून काँग्रेसच्या खासदार प्रिया दत्त यांच्याविरोधात त्या तुल्यबळ उमेदवार ठरण्याची शक्यता आहे. चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांसह माजी पोलिस आयुक्त डॉ. सत्यपालसिंह यांच्यापर्यंत अनेक नावांचा विचार झाल्यावर महाजन यांना लढविण्याचा निर्णय झाला. दत्त यांच्याविरोधात उभे करण्याकरिता भाजपमध्ये एकीकडे प्रबळ उमेदवाराचा शोध सुरू होता, तर प्रमोद महाजन यांची कन्या असलेल्या पूनम यांच्यासाठी मतदारसंघाची शोधाशोध सुरू होती. अखेर दोन्ही प्रश्न एकाच वेळी सुटले, आणि आपण ‘काखेत कळसा’ घेऊन उगीचच ‘गावाला वळसा’ घातला, असा विचार करत नेत्यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. सोलापूरमध्ये शरद बनसोडे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.
उत्तर-मध्य मुंबईत कोणाला उमेदवारी द्यायची, यावर पक्षात बराच खल झाला होता. नाना पाटेकर, प्रीती झिंटा, मोहित कंबोज, आशिष शेलार अशा अनेक नावांची पक्षात चर्चा झाली. पण कोणीही तयार झाले नाही. ही जागाजिंकणे भाजपला सोपे नाही, त्यामुळे चित्रपटसृष्टीतील उमेदवार द्यावा, असा विचार पक्षात होता. पूनम महाजन या ईशान्य मुंबईतून निवडणूक लढविण्यास सुरूवातीला इच्छुक होत्या. पण किरीट सोमैय्या यांनी बाजी मारून उमेदवारी मिळविली. पूनम यांची विधानपरिषद किंवा विधानसभेसाठी विचार करावा, अशी काही नेत्यांची मते होती. उत्तर-मध्य मुंबईत प्रिया दत्त यांच्याविरोधात प्रबळ उमेदवाराचा शोध सुरू असताना महाजन यांनी या मतदारसंघात लढण्याची तयारी दाखविली.

Story img Loader