विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप आणि शिवसेनेशी युतीच्या मुद्दय़ापासून काही बाबींवर भाजपची रणनीती ठरविण्यासाठी प्रदेश भाजप नेत्यांची शुक्रवारी नवी दिल्लीत बैठक होणार आहे. भाजपच्या ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेत अमित शहा अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतील व त्यानिमित्ताने दोन दिवस दिल्लीस गेलेल्या प्रदेश नेत्यांची केंद्रीय नेतृत्वाशी निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा होईल. अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणीत फेरबदल होणार असून राज्यातील काही नेत्यांना व खासदारांना राष्ट्रीय पातळीवर नवीन जबाबदारी दिली जाईल.
‘त्या’ १९ जागांसाठी विशेष रणनिती
महायुतीतील जागावाटपात तणाव असून चारही घटकपक्षांनी बऱ्याच जागांची मागणी केली आहे. किमान निम्म्या जागा शिवसेनेकडून मिळाव्यात, अशी भाजपची अपेक्षा असली तरी ती पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे जागावाटप बोलणी फिसकटल्यास कोणती रणनीती आखायची, याची चर्चा राष्ट्रीय अध्यक्षांशी होणे अपेक्षित आहे. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्यासह काही नेत्यांबरोबर अमित शहा यांची चर्चा होईल. भाजपचा योग्य सन्मान राखला जाईल आणि पक्षाची ताकद वाढेल, अशा पध्दतीने निर्णय घेण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी याआधीच दिल्या आहेत. मात्र ज्येष्ठ भाजप नेते प्रमोद महाजन आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली युती एवढय़ा वर्षांनी कशी तोडायची आणि त्याचे खापर आपल्यावर नको, असा भाजप व शिवसेना नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे शिवसेनेकडून ११७ हून अधिक जागा पदरात न पडल्यास अधिकाधिक जागा निवडून आणण्याचे प्रयत्न करायचे, एवढाच मार्ग भाजपपुढे राहणार आहे.
दरम्यान, राज्यातील काही नेत्यांना केंद्रीय पातळीवर नवीन जबाबदारी मिळण्याची चर्चा सुरू आहे. माजी अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, किरीट सोमय्या यांच्यासह काही नावे चर्चेत आहेत. महाराष्ट्रातही एक केंद्रीय मंत्री व पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यावर निवडणुकीची जबाबदारी दिली जाईल.

Story img Loader