आजचा लेख लिहिताना मन विषण्ण आहे. विचारप्रणाली स्तब्ध झाली आहे. काही सुचत नाही असं म्हणतात ना तसं झालं आहे.
गेल्या आठ दिवसांत निवडणूक प्रचारात जी कारस्थानं, छल, कपट, निर्लज्ज अभिव्यक्ती यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला त्यावरून पाताळालादेखील आपली उंची थोडी वर असल्याचा साक्षात्कार झाला असेल.
उत्तर प्रदेश हे गलिच्छ राजकारणाचं भूकंप केंद्र झालं आहे. सेक्युलरिझम या शब्दानं भारतात जितका धुमाकूळ घातला असेल तितका ‘वाय टू के’नं देखील नसेल. सेक्युलरिझमचा उच्छाद आता सहनशीलतेच्या पलीकडे गेला आहे. कारण त्याचा उपयोग करणारे लोक या शब्दाच्या नावाखाली त्याच्या स्थायीभावाचा दररोज मुडदा पाडत आहेत.
सेक्युलरिझम हा शब्द ब्रिटिश लेखक हॉलीओक यानं पहिल्यांदा वापरल्याची नोंद आहे. या शब्दाचं अवलोकन करताना त्याच्या कक्षा खूप विस्तीर्ण झाल्या आहेत. हॉलीओक म्हणतो, सेक्युलरिझम म्हणजे मानवाचं ऐहिक सुख शोधणं. याकरिता विज्ञानाची कास धरणं हे सूत्र ठरतं.
जे उचित आहे ज्यातून मानवी कल्याण होईल ते सेक्युलरिझम.
सेक्युलरिझमच्या संकल्पनेत निधर्मी राज्याची संकल्पना आहे. त्यात राज्यकर्त्यांनं सर्व धर्म समान मानणं, प्रत्येक समुदायाला स्वत:च्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचं स्वातंत्र्य असणं आणि सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे सत्तेकरिता कोणत्याही धर्माचं लांगूलचालन न करणं याचा अंतर्भाव आहे.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सेक्युलरिझमची माळ ओढणारे राज्यकर्ते इमाम बुखारींना जाऊन भेटतात. त्यांचा पाठिंबा मागतात. बुखारी तो देतात. या गोष्टीला अल्पसंख्याकांचा सन्मान ठेवणं म्हणतात. सहारणपूरचा उमेदवार नरेंद्र मोदींचे तुकडे करायचं म्हणतो. त्याला अल्पसंख्याकांची अस्मिता म्हणतात. ‘कारगिल युद्धात फक्त मुसलमान सैनिक मेले, याला अल्पसंख्याकांचा गौरव म्हणतात.’, ‘बलात्काराची प्रकरणं मुलांकडून होणारच’ याला अल्पसंख्याक मुलांची पौगंडावस्थेतील निष्पाप मानसिकता म्हणतात.
वरील सर्व संतमहात्मे कोण आहेत? उत्तर प्रदेशातील राज्यकर्ते, राजमान्य, राजर्षी सेक्युलरिझममंडित, लांगूलचालन संपन्न, प्रजाअहितवादी सत्तापिपासू नेते.
वाईट याचं वाटतं की आपला उल्लू सीधा करण्याकरिता या लोकांनी अल्पसंख्याकांची बुद्धी बधिर करून ठेवली आहे. उत्तम शिक्षण, पायाभूत सुविधा, रोजगार, सर्वव्यापी प्रगती, जीवनमानात आमूलाग्र सुधार या गोष्टींचं महत्त्व हे सत्तापिपासू अल्पसंख्याकांना सांगणार नाहीत. धर्मावर कायमच संकट आहे हे सांगत शेकडो र्वष त्यांना झुलवत ठेवणार. सीतारों के आगे जहाँ और भी है, चला प्रगती करू या. आयुष्य बदलू या असं कधी सांगणार नाहीत. वर एवढे सगळे उद्योग राजरोसपणे करून जगाला सेक्युलरिझमची पट्टी पढवायला मोकळे.
वाचकांना वाटेल, भगव्या दहशतवादाबद्दल मी काहीच उल्लेख करत नाही. पण एक गोष्ट या निवडणुकीत निश्चित दिसत होती, की भाजपनं विकासाचा अजेंडा हाती घेतला आहे. ज्वालाग्राही मुद्दे टाळले आहेत. अमित शहांची प्रतिक्रिया समर्थनीय नाही, पण सेक्युलरिझमचं श्राद्ध घालणारेच लोक सेक्युलरिझमचे प्रवचनकार आहेत हे नक्की!
– रवि पत्की sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)

Story img Loader