प्रत्येक क्षेत्राचा, विषयाचा एक वेगळा शब्दकोश असतो. तो शब्दकोश पुस्तकी असतो आणि त्या विषयातले तज्ज्ञ, जाणकार त्यात नित्यनियमाने भर घालत असतात. उदाहरणार्थ, एखादी संगीताची मैफल छान झाली याला कलाकाराने ‘मैफल मारली’ म्हणतात. क्रिकेटमध्ये एखादा फलंदाज भेदरलेल्या स्थितीत खेळत असेल तर तो ‘आतून आऊट’ होऊन आला होता, असे म्हटले की कळते. शेअर खरेदी-विक्रीला ‘लाँग, शॉर्ट’ म्हणतात. टाऊन प्लॅनिंगमध्ये अलीकडच्या वस्तीला लोअर तर लांबच्या वस्तीला अप्पर म्हणतात. असाच मजेशीर निवडणुकीचासुद्धा एक वेगळा शब्दकोश आहे. गेल्या तीस-पस्तीस वर्षांत वेगवेगळय़ा निवडणुकीतील बदल लक्षात घेत असताना कार्यकर्त्यांच्या बोलीतील नवीन संज्ञा कायमच लक्ष वेधून घेत आल्या आहेत. त्यातल्या काही तुमच्याशी शेअर करतो. तुम्ही ऐकल्या असतील तर उजळणीचा आनंद शेअर करू.
निवडणूक जशी जाहीर होते तशा कार्यकर्त्यांच्या मीटिंग्जची धामधूम चालू होते. पण कार्यकर्ते मीटिंगचा निरोप देताना आज अमुक एकाकडे मीटिंग होणार आहे असं न म्हणता ‘मीटिंग लावली’ आहे, असे म्हणतात. ‘मीटिंग लावणे’ या अंतर्गत आढावा घेणे ते नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढणे हे सगळे येते. आपल्या एरियात ‘फील्डिंग टाईट लावली आहे’ याचा अर्थ कार्यकर्ते बारीक लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे विरुद्ध पार्टीचा उमेदवार पैसे वाटू शकणार नाही, असा असतो.
‘आपल्याला टाकणार नसशील तर अमक्याला चालव’ याचा अर्थ तिस-यालाच मत देऊन माझ्याशी ज्याची सरळ स्पर्धा आहे, त्याची मते काप असा असतो.
उमेदवाराने ‘ढील दिली पाहिजे’ म्हणजे पैसे सोडायला हवेत.
उमेदवार भारी नाही, पण ‘लय नोट आहे.’ यात नोट म्हणजे पैसेवाला आहे असा अर्थ आहे. या वेळेस वाडीत अमक्या अमक्याला ‘वाँटेड आलंय’ म्हणजे अमुक एखादा उमेदवार जोरात आहे. आपला उमेदवार येईल, पण घासून होणार म्हणजे कडवी टक्कर अपेक्षित आहे. ‘मतदान एकटय़ाने केले की जोडीने’ याचा अर्थ मतदानाला जाताना सौभाग्यवती बरोबर होत्या का, असा नसून मतदान एकदा केले की दोनदा असा आहे.
सेटलमेंट झाली, मॅनेजमेंट झाली यात विविध मार्गाने असंतुष्टांना शांत केले असा आहे. टिकटिक याचा अर्थ घडय़ाळाला मतदान, पाँच उंगली म्हणजे पंजाला, तर अर्जुन म्हणजे धनुष्यबाण. लक्ष्मीबाई प्रसन्न म्हणजे कमळाला मतदान, कारण लक्ष्मी कमळावर विराजमान असते म्हणून. ‘जिपडं किती लावायची’ म्हणजे मतदानाच्या दिवशी मतदारांना आणायला किती वाहनांची सोय करायची (जीप) असा आहे.
‘नुस्ता धुरळा करून टाकणार’ म्हणजे कार्यकर्त्यांना हवे ते देऊन खूश ठेवणार. काही कार्यकर्त्यांचे मजेशीर इंटरेस्ट असतात. त्यांचे लक्ष एखाद्या घरातील त्यांच्या ‘इंटरेस्टची विशेष व्यक्ती’ मतदानाच्या दिवशी मतदानाला येऊन गेली का, याकडे असते. सगळीकडे फिरण्याच्या धामधुमीत तो कार्यकर्ता आवर्जून बूथवर येऊन आमच्या ‘स्पॉट’चे मतदान झाले का, म्हणून विचारतो. नसेल तर वेळात वेळ काढून त्या घरात स्वत: जाऊन आठवण करून येतो.
मतमोजणी झाल्यावर जिंकलेल्यांना बेभान उधाण येते. त्यात वापरले जाणारे शब्द वैयक्तिक भेटीतच सांगता येतील. तोपर्यंत हॅपी वोटिंग!
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा