भारत सरकारला अगदी मुळातून हादरा देण्यापासून ते अनुचित वादविवाद भडकावणाऱया, कमालीच्या अडचणीत असतानाही अविश्वसनीय धीट वागणुकीचा आदर्श दाखविण्यापासून ते वर्षानुवर्षांची कष्टाने कमावलेली प्रतिष्ठा व नावलौकिक डोळ्याची पापणी लवायच्या आत गमावणाऱया, निवडणूक प्रचारसभेला जमलेल्या जमावाच्या भावना आपल्या आवेशयुक्त भाषणाने उत्तेजित करण्यापासून ते अजिबात न बोलण्याने स्वत:ला अडचणीत पाडून घेणाऱया अनेक नेत्यांना आपण पाहिले आहे. या नेत्यांनी सामान्य माणसांच्या भावनेला भुरळ घातली. यातल्या काहीना दैवाने साथ दिली, तर काही आपल्या समाजातील बऱया-वाईट गोष्टींमुळे मागे पडले.
एखाद्या सामाजिक संस्थेच्या प्रचारकासारख्या सामान्य कार्यकर्त्यापासून एक प्रभावशाली राजकीय नेता बनून भाजपासारख्या प्रमुख पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार बनण्याची नरेंद्र मोदींची झंझावाती प्रगती ही एक असामान्य यशोगाथाच! गुजरात राज्याची सुत्रे त्यांनी हाती घेतली तेव्हा ते तुलनेने फारसे कुणाला माहितही नव्हते. पण गोध्रा स्थानकात उभ्या असलेल्या साबरमती एक्स्प्रेसला आग लागल्यानंतर जी जातीय दंगल भडकली त्यातून त्यांचे राजकीय भविष्य पार पालटून गेले. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर गेल्या एक तपापेक्षा जास्त काळ असण्याचा विक्रम करणारे नरेंद्र मोदी गेली अनेक वर्षे प्रकाशाच्या झोतात आहेत.
शेकडो मुस्लिम जनतेचा बळी घेणाऱया या जातीय दंगलींना आवर घालू न शकल्याबद्दल विरोधी पक्षांनी व प्रसारमाध्यमांनी त्यांची खूप निर्भत्सना केली. पण काही अंशी या कडक टीकेचे लक्ष्य बनल्यामुळे ‘हिंदूंचा पालनहार’ या नात्याने त्यांची प्रतिमा उजळतही गेली. आज काही भारतीयांना ते पंतप्रधानपदासाठी योग्य, लायक उमेदवार वाटतात तर काहीना ते धर्मांध हिंदू वाटतात. आश्चर्याची गोष्ट ही की अलीकडेपर्यंत त्यांचे कार्यक्षेत्र जरी गुजरातपर्यंतच सीमित असले, तरी मोदींची लोकप्रियता साऱया भारतात पसरलेली आहे. त्यांच्या मताचा प्रभाव भारतातच नव्हे, तर भारताबाहेरही पसरला आहे. काहीना ते त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षिततेबाबतच्या मतांमुळे तर काहीना त्यांच्या गुजरातमधील विकास कार्यामुळे वीर पुरुष वाटतात.
सुरुवातीला भाजपच्या श्रेष्ठींना वाटायचे की त्यांना पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार म्हणून निवडल्यास त्या पक्षाला पुन्हा सत्तेवर येण्यात अडचणी येतील पण भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांत त्यांची प्रतिमा इतकी उज्ज्वल झालेली होती व त्यांची लोकप्रियता इतकी वाढली होती की शेवटी भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वाला त्याची दखल घेऊन गोव्यात भरलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषदेत [१] त्यांची २०१४ च्या लोकसभेच्या निवडणूक मोहीम समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. असे होणार हे जवळ-जवळ नक्की झाल्यावर प्रधानपदाची आशा धरून असलेल्या अडवाणींनी गोव्याच्या परिषदेत ‘प्रकृती अस्वास्थ्यास्तव’ हजर राहण्याचे टाळले. त्यांच्याबरोबर सुषमा स्वराजही आल्या नाहीत. त्यावेळी नजीकच्या भविष्यकाळात आयोजित राजस्थान, मध्यप्रदेश, दिल्ली, छत्तीसगड व मिझोराम येथील विधानसभा निवडणुका होईपर्यंत हा निर्णय घेऊ नये, असाही आग्रह झाला, पण तो राष्ट्रीय नेतृत्वाने मानला नाही.
पण कोंबडा न आरवल्याने जसा सूर्य उगवायचा थांबत नाहीं तसेच झाले.
अडवाणींनी आपल्या सर्व पदांच्या राजीनाम्याचेही नाटक केले पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. आधी मोदींची निवडणूक मोहीम समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली व पाठोपाठ १३ सप्टेंबर रोजी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणूनही त्यांचे नाव घोषित करण्यात आले.
गुजरातमधील दंगलींमुळे मोदींना भारतात व परदेशांतही बरीच वर्षें राजकीय दृष्ट्या वाळीतच टाकल्यासारखे वागविले जात होते. पण गुजरात राज्याची प्रगती व त्यातून आपल्या देशाचा होऊ शकणारा फायदा पाहून युरोपियन राष्ट्रांनी त्यांच्याबाबतचा आपला पवित्रा बदलला. इंग्लंड व युरोपने त्यांच्यावरचा बहिष्कार आता उठवल्यातच जमा आहे व अमेरिकाही बरीच निवळलेली असून ‘मोदी पंतप्रधान झाल्यास त्यांना व्हिसा दिला जाईल’ असे अमेरिकेने जाहीर केले आहे.[२]
गेल्या काही वर्षांपासून मोदींनी आपली प्रतिमा ‘जहाल हिंदूवादी’ऐवजी ‘सर्वांना स्वीकारार्ह वाटणारा नेत्याच्या रूपात बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यादृष्टीने त्यांनी निधर्मीपणातून धर्म वजा केला व निधर्मीपणाची नवी स्वत: निर्मिलेली ‘India First’ ही व्याख्या भारतीय जनतेला दिली.[३] गेल्या दोन वर्षांत मोदींच्या दृष्टीने एक अनुकूल बदल होताना दिसत आहे. पहिली चुणूक दिसली ‘दारुल उलूम देवबंद’ या देवबंद पंथाच्या धार्मिक शिक्षणसंस्थेचे उपकुलगुरू (मोहतमीम) व गुजरातचे एक मुस्लिम धर्मगुरू मौलाना गुलाम अहमद वास्तानवींच्या विधानाने! २०११ मध्ये ते नव्याने मोहतमीम नेमले गेले होते व त्यांनी ‘मोदींच्या विकासाच्या कामांमुळे मुस्लिम जनतेवर सकारात्मक प्रभाव पडला आहे’ असे उद्गार काढले होते! एमबीए शिकलेल्या वास्तानवी यांनी टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ‘गुजराती मुसलमानांच्याविरुद्ध कसलाही भेदभाव केला जात नाही व गुजरातमध्ये सर्व समाजाची भरभराट होत आहे. २००२ च्या दंगली म्हणजे साऱया भारताला लागलेले लांछन आहे व मुसलमानांनी आता पुढची वाटचाल करावी’ असे उद्गार काढले होते[४]. हे विधान केल्यावरून खूप गदारोळ माजला व काही भडकलेल्या मुस्लिम नेत्यांनी त्यांना मोहतमीम पदावरून काढून टाकायची मागणी केली. त्या दबावापायी शेवटी जुलैमध्ये त्यांना जायला सांगण्यात आले व त्यानुसार त्यांनी आपला राजीनामा दिला.
अगदी अलीकडे ‘उलेमा-ए-हिंद’चे नेते मौलाना महमूद मदानी यांनी एका खासगी चित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, ‘गुजरातमध्ये मुस्लिम जनतेशी जवळीक असलेल्या ’जमीयत’च्या कार्यकर्त्यांनी मला सांगितले की २०१२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकांत कित्येक मतदारसंघांत मुसलमानांनी मोदींना मते दिली आहेत. हा सहज जाणविण्याजोगा बदल दिसत आहे आणि आज परिस्थितीसुद्धा बदललेली आहे.’ मदानी पुढे म्हणाले की मुसलमानांनी मोदींना मते दोन कारणामुळे दिली. एक कारण होते भीती तर दुसरे कारण होते मोदींना चांगला कुठला इतर पर्यायच दिसत नाहीये.’ मदानी पुढे म्हणाले की गुजरातमधील मुसलमान जनता आर्थिक दृष्ट्या कित्येक तथाकथित निधर्मी राजवट असलेल्या राज्यांतील मुस्लिम जनतेपेक्षा जास्त सधन आहे. तथाकथित निधर्मी राजवट असलेल्या राज्यांत जितके निर्दोष मुसलमान तुरुंगात आहेत त्यापेक्षा गुजरातेत कमी आहेत. मानवाधिकारांच्या बाबतीत निधर्मी राजवट असलेल्या कित्येक राज्यात अगदी शोचनीय परिस्थिती आहे आणि पश्चिम बंगालमध्ये मुसलमानांची आर्थिक परिस्थिती अगदी धक्कादायक आहे. या राज्यांत मुख्यमंत्रीपदावर कुणी मोदी नाहीत. या सत्य परिस्थितीकडे कुणीच दुर्लक्ष करू शकत नाहीं.” थोडक्यात मुस्लिम समाजात मोदींची स्वीकारार्हता वाढत असून मुस्लिम जनता त्यांच्याकडे एक चांगले प्रशासक म्हणून त्यांच्याशी समेट करू इच्छित आहे, असे दिसते.
ते भाजपचे महासचिव असल्यापासून चित्रवाणीच्या माध्यमातून मी स्वत: त्यांना पाहात आलेलो आहे. आपला मुद्दा ठासून मांडण्याची त्यांची जिद्द मी तेव्हापासून पाहिलेली आहे. त्यावेळी राजदीप सरदेसाई ’एनडीटीव्ही’ या चित्रवाहिनीवर काम करायचे व एखाद्या महत्वाच्या मुद्द्यावर ते अनेक नेत्यांना एकत्र आणून त्यांच्याशी चर्चा करायचे (‘The Big Fight’). पण सगळेच नेते बलदंड असल्यामुळे वादविवादाच्या दरम्यान हे नेते बिचार्या संचालकाला भीक घालत नसत. त्या साऱया चर्चांमध्ये स्वत:च्या सत्तेचा दुरुपयोग सातत्याने चालू असताना अजिबात क्षुब्ध न होता आपला मुद्दा सभ्य शब्दात पण ठासून मांडणारे मोदी मला आजही आठवतात.
मोदींचे पूर्वायुष्य
नरेंद्र मोदींचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी मुंबई प्रांताच्या[५] मेहसाणा जिल्ह्यातील वाडनगर गावात झाला. त्यांचे वडील दामोदरदास हे एक कनिष्ठ मध्यमवर्गात मोडणारे अडत व्यापारी होते. घरी विजेचे दिवे नाहीत, घासलेटचे दिवे लावल्यास घुसमट व्हायची, अशी घरची परिस्थिती. दामोदरदास-हीराबेन यांच्या चार अपत्यांतील ते तिसरे. वाडनगर रेल्वेस्थानकावर (व गाडी फलाटावर उभी असताना गाडीतील प्रवाशांना) ते चहा विकत असत. शाळेतही ‘ते एक सामान्य विद्यार्थी पण कुशल वक्तृत्वपटू होते’ अशी आठवण त्यांचे तत्कालीन शिक्षक काढतात.
अशा स्थितीत त्यांच्या आयुष्यातली उल्लेखनीय घटना म्हणजे त्यांनी ऐन तारुण्यात रा. स्व. संघात केलेला प्रवेश. १९७१च्या युद्धानंतर गुजरात राज्याच्या एस.टी. कॅन्टीनमधील काम सोडून मोदींनी रा. स्व. संघात प्रवेश केला व ते रा. स्व. संघाचे पूर्ण वेळेचे प्रचारक बनले. त्यांनी हेडगेवार भवनात प्रवेश केला. ८-१० खोल्यांच्या या इमारतीत केर काढण्यापासून ते रा. स्व. संघाच्या श्रेष्ठींसाठी चहा-नाश्ता तयार ठेवण्यापर्यंत पडतील ती कामे त्यांनी केली. तसे पहाता हे प्रचारकाचे काम अगदीच नजरेत न येणारे, अजिबात चमकधमक नसलेले काम.[६] गावोगावी जाऊन, तिथल्या स्थानिक संघ कार्यकर्त्यांच्या घरी मुक्काम करून हे प्रचारक संघाच्या कार्याचा प्रचार करतात व संघटना वाढवतात. सत्ता शोधणाऱयासाठी हे पद नसून खरोखर सामाजिक कार्याला वाहून घेणाऱयासाठीच हे काम आहे. याच संघटनेत ते रमले व मोठे झाले. जसजसे त्यांचे उच्च प्रतीचे कर्तृत्व व नेतृत्वाचे गुण इथे उमलत-बहरत गेले व लोकांच्या व नेत्यांच्या लक्षात येऊ लागले तसतशा त्यांच्यावर अधिकाधिक जबाबदाऱया टाकण्यात येऊ लागल्या. प्रचारक असताना त्यांनी गुजरात विश्वविद्यालयातून राज्यशास्त्राची उच्च पदवी प्राप्त करून घेतली. ते तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्मलेले राजपुत्र नसून स्वत:च्या श्रमाने व गुणांमुळे टप्प्या-टप्प्याने मोठे होत गेलेले आहेत व आज ते भारताची सर्वोच्च जबाबदारी घेण्यासाठी ’दक्ष’चा पवित्रा घेऊन उभे आहेत.
नागपूरला काही काळ प्रशिक्षण घेतल्यावर त्यांच्याकडे गुजरातच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची जबाबदारी आली. मोदींनी अनेक चळवळींचे नेतृत्व केले. आणीबाणीच्या काळात भूमिगत होऊन, मोटरसायकलवरून वेष बदलून हिंडत, आणीबाणीविरुद्ध पत्रके वाटणे अशी अनेक जोखिमीची कामे त्यांनी केली. त्यातून रा. स्व. संघाच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांच्यातील संघटनात्मक कौशल्याची चुणूक व विश्लेषणात्मक बुद्धी दिसून आली. याच सुमाराला त्यांनी गुजरात विद्यापीठातून राज्यशास्त्रात उच्च पदवी (M. A.) प्राप्त केली. या काळात ते वसंत गजेंद्रगडकर व नाथालाल जघदा यांच्या संपर्कात आले. रा. स्व. संघाने त्यांची १९८७ साली भाजपासाठी नेमणूक केली. या नेमणुकीपायी त्यांना मुरलीमनोहर जोशी यांच्या एकता यात्रेत कार्य करण्याची संधी मिळाली व त्या कामामुळे ते एकदम प्रकाशात आले. १९९५ सालच्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीतील यशात त्यांची व्यूहरचना मध्यवर्ती ठरली. त्यानंतर ते भाजपाचे कार्यवाह/सरचिटणीस झाले आणि त्यांना दिल्लीला पाठविण्यात आले. तिथे त्यांना हरयाना व हिमाचल प्रदेश या राज्यांतील पक्षाच्या उपक्रमांची जबाबदारी देण्यात आली.
निर्णय घेताना ते ठाम असतात व तडजोड करताना दिसत नाहीत. ऑक्टोबर २००१ मध्ये वरकरणी प्रकृती अस्वास्थ्यामुळे केशू्भाईंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पण खरे तर सत्तेचा दुरुपयोग, भ्रष्टाचार, दुबळे प्रशासन, पोटनिवडकांत झालेला भाजपाच्या उमेदवारांचा पराजय व भुज येथील भूकंपानंतरच्या मदतकार्यातील अव्यवस्था ही खरी कारणे त्यामागे होती व त्यामुळे त्यांना बदलायचा निर्णय भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने घेतला. केशूभाईना मुख्यमंत्रीपदावर कायम ठेऊन त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून मोदींनी काम करावे असा विचारही काही श्रेष्ठींच्या मनात होता. पण ‘खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी’च्या थाटात मोदींनी अडवानी व वाजपेयींना स्पष्टपणे सांगितले कीं ते गुजरात राज्याची पूर्ण जबाबदारी घ्यायला तयार आहेत पण अर्धवट जबाबदारी घ्यायला तयार नाहींत.
शेवटी ७ ऑक्टोबर २००१ रोजी त्यांची गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली व त्यांना २००२ सालच्या निवडणुकीसाठी ’भाजपा’ला तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसचे डबे पेटून झालेल्या हिंदू यात्रेकरूंच्या मृत्यूनंतर जी जातीय दंगल गुजरातमध्ये उसळली त्यामुळे मोदींवर खूप टीका झाली. पण या हत्याकांडात त्यांचा अजिबात हात नव्हता व उलट त्यांनी हे हत्याकांड आटोक्यात आणायचा खूप प्रयत्न केला असे जरी आता उघड झाले असले तरी या दंगली त्यांना चिकटल्याच. पण ते आपले म्हणणे ताठ मानेने व उजळ माथ्याने सांगत राहिले व त्यांनी गोध्रा हत्याकांडाच्या आरोपांचा ‘भृगुलांछना’सारखा उपयोग करून घेतला. आता तर सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा त्यांना निर्दोष ठरविले आहे व या अध्यायावर सध्यापुरता का होईना पण पडदा पडलेला आहे.
मोदी शाकाहारी आहेत व त्यांची राहणी अतिशय साधी व काटकसरी आहे. त्यांनी फक्त तीन वैयक्तिक मदतनीस आपल्या कामांसाठी नेमले आहेत. ते खूप कष्टाळू आहेत व दररोज खूप वेळ काम करण्यात व्यग्र असतात. ते गुजराती भाषेत कविताही लिहितात. ते एक उत्कृष्ठ वक्ते असून त्यांच्या भाषणांना प्रचंड जनसमुदाय जमतो. आता राजकारणात प्रगती होऊ लागल्यापासून ते आपले इंग्लिश भाषेवरील प्रभुत्व वाढवू पाहात आहेत.
ते स्वभावाने तसे एकलकोंडे आहेत. त्यांच्या आयुष्यातील १७व्या वर्षापासून २१व्या वर्षापर्यंतचा काळ काहीसा गूढ परिस्थितीत गेला. ते महिने-महिने नाहीसे होत. १८ वर्षाचे असताना आपल्या कुटुंबाला सोडून ते हिमालयात हिंडायला गेले होते. हा स्वभाव त्यांच्या वयाच्या ४५व्या वर्षीही दिसला. त्यावेळी ते एकटे गीरच्या जंगलात गेले व एका जुन्या मंदिरात एकटे राहिले, एकटे झोपले. “मला एकांत आवडतो” असे ते स्वत: सांगतात.
स्वत:च्या उत्कर्षासाठी उच्च प्रतीचे गुरू व मार्गदर्शक मोदी निवडतात. त्यांचा आपल्या उत्कर्षासाठी उपयोग करून घ्यायचे कौशल्य मोदींच्याकडे भरपूर आहे. त्यामुळे ’भाजपा’च्या अधिकारपदांवर मोदी वेगाने वर जाऊ शकले. रा. स्व. संघाचे अवघे दोन प्रचारकच आज ’भाजप’त पूर्ण वेळ कार्यरत आहेत.
१९८६ सालची अहमदावाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला विजय मिळवून देताना त्यांनी बजावलेली भूमिका श्रेष्ठींच्या नजरेत आली व त्यांचे कौतुकही झाले. पाठोपाठ ते भाजपाच्या गुजरात राज्याचे संघटनात्मक सचिव झाले. या काळात पक्षीय राजकारणातले बारकावे त्यांनी आत्मसात केले. भाजपाच्या सभांमध्ये गुपचूप मागे बसून ते भाषणांकडे सखोल नजरेने लक्ष देऊ लागले. या काळात त्यांनी कार्यकर्त्यांचे जाळे राज्यभर उभे केले. या जाळ्याचा आपले बस्तान ठीक बसवण्यात त्यांना खूप उपयोग झाला व त्यायोगे ते आपल्या हितशत्रूंचा नायनाट करून भाजपची गुजरातची सर्व सूत्रे आपल्या हातात घेऊ शकले.
मोदींनी त्यांना मिळालेल्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करून घेतला. अडवानींच्या प्रेरणेने आयोजित केली गेलेली रथयात्रा ही त्यांची राष्ट्रीय पातळीवरील पहिलीच जबाबदारी होती. पण मुरली मनोहर जोशींच्या एकता यात्रेत त्यांच्यावर जास्त मोठी जबाबदारी टकण्यात आलेली होती. मोदी चोरट्या पावलांनी भाजपच्या नेतृत्वाच्या सर्वोच्च स्तरावर जात असलेले केशूभाई पटेल, शंकरसिंह वाघेला व काशीराम राणासारख्या नेत्यांना खुपत होते. पण कालांतराने मोदींनी या उच्च नेत्यांमधील परस्पर विसंगती आणि हेवेदावे यांचा उपयोग करून व त्यांना एकमेकांशी भिडवून स्वत:चा फायदा करून घेतला. या प्रयत्नांत त्यांनी अडवाणींच्या पाठिंब्याचाही खूप उपयोग करून घेतला.
रा. स्व. संघाचे सभासद असणाऱया मोदींना प्रसारमाध्यमे व अभ्यासक हिंदू राष्ट्रवादी समजतात.[७] भारताच्या पंतप्रधानपदासाठीचे भाजपाचे उमेदवार म्हणूनही त्यांची निवड झाल्यापासून ते राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) झंजावाती प्रचार मोहिमेच्या अग्रभागी आहेत व त्यांचे नेतृत्व परिणामकारक होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
२००२ ची गुजरातमधील जातीय दंगल
२७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा येथे एका आगगाडीला आग लावण्यात आली. त्यात ५८ हिंदू यात्रेकरू मृत्युमुखी पडले. ही आग मुस्लिम जमावाने लावली, अशी अफवा उठल्यामुळे अख्ख्या गुजरात राज्यभर एक संतापाची उस्फूर्त लाट उसळली व त्यापायी व्यापक प्रमाणावर दंगल पेटली. त्यात किती मृत्युमुखी पडले याचा अंदाज ९०० ते २००० असा आहे. शेकडो लोक जखमी झाले. दंगल आटोक्यात आणण्यासाठी मोदी सरकारने कित्येक शहरांत संचारबंदी लागू केली, दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे हुकूम दिले आणि दंगल आणखी भडकू नये म्हणून लष्करालाही पाचारण केले. मानवाधिकार संघटनांनी, विरोधी पक्षांनी व काही प्रसारमाध्यमांनी गुजरात सरकारवर दंगली आटोक्यात आणण्यासाठी पुरेशी कारवाई न केल्याचे व काही बाबतीत या दंगलींकडे काणाडोळा केल्याचे आरोप केले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने या जातीय दंगलीच्या घटनांमधील गुजरात सरकारच्या व मोदींच्या भूमिकेचा छडा लावण्यासाठी एक विशेष तपास पथकाची नेमणूक केली होती. या पथकाने २०१० सालच्या डिसेंबर महिन्यात कोर्टाला दिलेल्या अहवालात मोदींविरुद्ध जाणून-बुजून दंगली भडकू दिल्याचा व त्यांना प्रोत्साहन देण्याचा अपराध दर्शविणारा कसलाही पुरावा सापडला नसल्याचा अहवाल कोर्टाला सादर केला. मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचे मृतदेह गोध्र्याहून अहमदाबादला आणण्याच्या मोदींच्या निर्णयावरही बरीच टीका झाली होती. कारण त्यामुळे धार्मिक भावना आणखीच भडकल्याचे त्यांचे मत होते. पण खास अन्वेषण पथकाला हा निर्णय योग्यच वाटला.
२०१२च्या एप्रिलमध्ये खास अन्वेषण पथकाने २००२ साली झालेल्या अनेक दंगलींपैकी गुलबर्ग सोसायटीत झालेल्या हत्याकांडातील मोदींच्या सहभागाच्या आरोपांबाबतही दोषमुक्त ठरविले. ७ मे २०१२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या राजू रामचंद्रन् या निष्पक्षपाती सल्लागाराने असे सांगितले की मोदींच्यावर वेगवेगळ्या जातींमध्ये तेढ निर्माण केल्याबद्दल खटला चालविणेच योग्य ठरेल. कारण विशेष तपास पथक तपास करू शकते पण निकाल देऊ शकत नाही त्यामुळे पुरावा तपासण्याचे काम न्यायालयानेच केले पाहिजे. या उलट विशेष तपास पथकाचे मत असे झाले की निष्पक्षपाती सल्लागाराने संजीव भट्ट यांच्या जबानीला अवाच्या सवा महत्त्व दिलेले आहे.
२००२ सालच्या विधानसभा निवडणुका
२००२ सालच्या दंगलीनंतर सगळीकडे मोदींच्या नावाने कोलाहल झाला, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली, विरोधी पक्षांनी लोकसभेचे काम बंद पाडले, तत्कालीन तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी, द्रमुक आणि तेलगू देसम् या दोन एनडीएमध्ये असलेल्या पक्षांनीही मोदींचा राजीनामा मागितला. मोदींनी विधानसभेची मुदत संपायच्या ८ महिने आधीच विधानसभा विसर्जित केली व राजीनामा दिला. पण त्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने १८२ पैकी १२७ जागा जिंकल्या. त्या निवडणूक प्रचारात मोदींनी कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेऊन २००१च्या लोकसभेवरील हल्ल्यासारख्या आतंकवादी कृत्यांवर भर देत प्रखर मुस्लिमविरोधी भाषाही वापरली. त्यांच्या या काळातील भाषणात “मियॉ मुशर्रफ” व बहुपत्नित्वाच्या मुभेला उद्देशून “हम पांच, हमारे पच्चीस” असे शब्दप्रयोगही केले गेले असे मी वाचले/ऐकले आहे.
मुख्यमंत्री म्हणून दुसरा कालावधी
पण शपथविधीनंतर मात्र मोदींनी आपल्या हिंदुत्वाच्या भूमिकेत बदल करून विकासावर भर दिला. त्यामुळे रा.स्व.संघाच्या प्रभावाखालील भारतीय किसान संघ व विश्व हिंदू परिषद अशा त्याकाळी गुजारातेत खूपच प्रबळ असलेल्या संघटनांचे महत्व कमी होऊ लागले. गोरधन ज़डफियासारख्या नेत्यांना मंत्रीमंडळातून वगळण्यात आले. ’भाकिसं’ने शेतकरी चळवळ सुरू केल्यावर मोदींनी त्यांना सरकारी घरांतून बाहेर काढले तर गांधीनगरमधील २०० बेकायदा देवळेही पाडली. मोदींनी आपल्या अनेक निर्णयांपूर्वी रा.स्व. संघाचा सल्ला घेणे व संघाला माहिती देणेही थांबविले.
अशा बदलांमुळे मोदींनी गुजरातला गुंतवणीसाठी अतीशय आकर्षक असे राज्य बनविले. वस्तुस्थितीवर आधारित पुरावे गुजरातमधील भ्रष्टाचार कमी झाल्याचे दर्शवीत होते आणि कुठे भ्रष्टाचार घडलाच तर तो मोदींच्या कानावर आलेला असायचाच. वित्तसंस्था व तंत्रज्ञान यांच्या वृद्धीसाठी त्यांनी खास क्षेत्रे बनविली. “जोशीला गुजरात”[८] शिखरपरिषदेत जवळ-जवळ साडेसहा लक्ष कोटी रुपयांचे व्यवहारांबाबत मतैक्य झाल्याच्या सह्या करण्यात आल्या.
२००४च्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी वाजपेयींनी मोदींना दूर ठेवून उत्तर भारतातील मुस्लिम जनतेशी जवळीक साधायचा प्रयत्न केला.[९] २००४ सालच्या पराजयाच्या अनेक कारणांमध्ये २००२ सालच्या दंगली हे एक कारण होते व मोदींना ताबडतोब मुख्यमंत्रीपदावरून न काढून टाकण्याची चूक भाजपाला भोवली असे ते मानतात.
२००७ ची विधानसभा निवडणूक
या निवडणुकीला सामोरे जाताना भाजपाने आतंकवादाविरुद्ध जोरदार आघाडी उघडली. २००६च्या मुंबईतील बॉम्बहल्ल्याच्या घटनेनंतर त्यांनी ’पोटा’ कायद्याला पुनरुज्जीवित न करण्याच्या मनमोहन सिंग यांच्या निर्णयावर कडाडून हल्ला चढविला व राज्यांना स्वत:चे आतंकवादाविरुद्धचे कायदे बनविण्याची मुभा द्यावी अशी मागणी केली. २००१च्या लोकसभेवरील आतंकवादी हल्ल्यातील दोषी गुन्हेगार अफजल गुरूला फाशी देण्याचीही त्यांनी यावेळी वारंवार मागणी केली. २००७ च्या विधानसभा निवडणुकीत १८२ पैकी ११७ जागा जिंकून ते पुन्हा मुख्यमंत्रीपदावर आरूढ झाले.
२००८ च्या मुंबईवरील आतंकवादी हल्ल्यातील नरसंहारानंतर त्यांनी केंद्रसरकारबरोबर अनेक बैठका घेऊन त्यांनी गुजरातच्या १६०० किलोमीटर लांब किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी ३० जलदगतीच्या बोटींच्या निर्मितीची परवानगी घेतली.
मुख्यमंत्री म्हणून तिसरा कालावधी व मोदींचा विकास प्रकल्पांवर भर (२००७ ते २०१२)
गुजरात हे एक रखरखीत, शुष्क प्रदेश आहे आणि शेतीबद्दलच्या बाबतीत तो कधीच तडफदार मानला जात नाही, पण भूजलाच्या पुरवठ्यात झालेल्या वृद्धीमुळे अलीकडच्या काळात सौराष्ट्र, कच्छ आणि उत्तर गुजरातेत व ठिबकसिंचनाच्या उपयोगामुळे आणि शेतकऱयांना मिळणाऱया अखंड वीजपुरवठ्यामुळे कृषिउत्पादनात भरीव वृद्धी झालेली आहे. या उलट मध्य व दक्षिण गुजरातमध्ये सरदार सरोवर प्रकल्पासारखे प्रकल्प उभारूनही या सरकारी जलसिंचन योजनेचा हवा तितका उपयोग झालेला नाही!
गुजरातमधील रस्ते, बंदरे यांचा विकाससुद्धा मोदींच्या सरकारने उत्तम प्रकारे केलेला आहे. केशूभाई पटेल व मोदी यांच्या पाठोपाठच्या कारकीर्दींत पर्जन्यजलवृद्धीसाठी भाजप सरकारांनी बिगरसरकारी संघटना [१०] व नागरिक संघटनांना प्रोत्साहन देऊन मूलभूत सोयीच्या निर्मितीला प्राधान्य दिले. त्यात जयनारायण व्यास यांच्या सल्ल्यानुसार पावसाचे पाणी जमिनीत खोलवर नेऊन ते साठविण्याची “पर्जन्यजल साठवण”[११] योजना कार्यान्वित करण्यात आली. त्यासाठी ५ लाख बांधकामे उभी करण्यात आली. त्यात एक लाखावर बांधकामे तर पाणी अडवण्यासाठी उभारलेली धरणेच (check dams) होती. पावसाळा सुरू होईपर्यंत ही धरणे कोरडीच पडली होती पण नंतर या धरणांमुळे जमिनीखालचे सारे झरे जिवंत राहिले.
शिवाय “सुजलाम् सुफलाम्” योजने अंतर्गत मोदींनी नर्मदेवरील धरणाच्या सरदार सरोवर साठ्यातून पाणी आधी साबरमतीद्वारा अहमदाबादला आणले व तिथून पुढे मेहसाणासारख्या उत्तर गुजरातमध्ये नेले. नर्मदेच्या या पाण्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त पाणी खेचल्यामुळे ७००-८०० फूट खाली गेलेली भूस्तरावरील पाण्याची पातळी[१२] पुन्हा भरपूर वर आली व कूपनलिकेद्वारा शेतीला भरपूर पाणी मिळू लागले व पाण्याची पातळी वर आल्याने वीजही कमी लागू लागली. तेव्हापासून गुजरात राज्याने आपल्या भूमीखालील स्तरावरील पाण्याची पातळी वरच ठेवली आहे.[१३] त्याचा परिणाम म्हणून जनुकीयरित्या सुधारित [१४] ‘बीटी’ कापसाचे उत्पादन विक्रमी स्वरूपात वाढून भारतात सर्वात जास्त झाले कारण त्याला कूपनलिकांद्वारा पाणी पुरवठा करता येतो. रखरखीत, शुष्क जमीनीचा वापर व कापसाचे विक्रमी उत्पादन यांमुळे २००१-२००७ या कालावधीत गुजरात राज्याचे कृषिउत्पादन ९.६ टक्क्याच्या गतीने वाढले तर २००१-२०१० या दशकात विकासाची ’चक्रवाढ’ गती १०.९७ टक्क्यावर आली.
वीज पुरवठ्यासाठी गुजरातने एक अनुकरणीय क्लृप्ती वापरली (ज्योतीग्राम योजना). २००३-२००६ दरम्यान त्या राज्याने शेतकऱयांचा वीजपुरवठा एक वेगळ्याच वाहिनीद्वारे योजला व तिथे शेतकर्यांना योग्य वेळेला वीज पुरविली जाऊ लागली. आंध्र, तामिळनाडू या सारख्या राज्यात शेतकर्यांना वीज फुकट दिली जाते तर इतर काही राज्यात सवलतीच्या दरात. पण त्यामुळे या राज्यांत वीज वाया घालविली जाते व भूमीखालील स्तरावरील पाण्याची पातळी खाली जाऊ लागते. गुजरातने ही योजना राबविण्यास सुरुवात केल्यावर आधी आंदोलने झाली, पण मग शेतकऱयांना कळून आले की या योजनेमुळे त्यांना हवी तेंव्हा वीज नक्की मिळते व विद्युत् दाबही (voltage) स्थिर मिळतो. शेतकऱ्यांना फुकटात वीज देण्यापेक्षा २४ तास वीज देण्यावर मोदींचा भर आहे. आता इतर राज्यांनीसुद्धा या पद्धतीचे अनुकरण करायला सुरुवात केलेली आहे.
मोदी गुजरातमध्ये विविध उद्योगांनी गुंतवणूक करावी, यासाठी नेहमीच तत्पर आहेत. मोदींच्या तडफदार नेतृत्वाचा व सर्वांचा फायदा करून देण्याच्या वृत्तीचा खरा परिचय झाला तो त्यांनी ज्या तडफेने टाटा कंपनीच्या नॅनो प्रकल्पाला जागा मिळवून दिली त्यात. उदाहरणार्थ सिंगूर येथे उभा होत असलेला त्या कंपनीचा प्रकल्प ममता बॅनर्जीमुळे बंगालबाहेर न्यायची टाटांवर जेव्हा पाळी आली तेव्हा मोदींनी अहमदाबाद जिल्ह्यातील सानंद या गावात एका आठवड्यात त्याना हवी असलेली जागा देऊ केली. याबद्दल खुद्द रतन टाटांनी मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत. शिवाय या जमिनींच्या किमती शेतकर्यांना बाजारभावाने मिळाल्या. (अधिक माहिती इथे http://en.wikipedia.org/wiki/Sanand_Plant_%28Tata_Motors%29 मिळेल)
आधी लिहिल्यानुसार मोदींनी आपली प्रतिमा बदलण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केले व त्याचाच भाग म्हणून त्यांनी ‘सर्वांना बरोबर घेऊन विकास’ या घोषणेचा उपयोग करत गुजरातमध्ये सर्वांच्या विकासाकडे लक्ष देत विकासाला धर्मावर आधारित ठेवले नाही. २०११-२०१२ मध्ये मोदींनी एका मागोमाग अनेक शहरांत उपोषण करत एक सदभावना उपक्रम राबवून गुजरातच्या मुस्लिम समाजाशी मैत्री आणि सर्व धर्मांत शांती, एकी व ताळमेळ वाढवण्यासाठी प्रयत्न केला.
१७ सप्टेंबर २०११ रोजी सुरू झालेल्या या उपक्रमाला तीन दिवसांच्या उपोषणाने सुरुवात झाली. गुजरातच्या २६ जिल्ह्यांत व ८ शहरांत त्यांनी ३६ उपोषणे केली. काही मुस्लिमांना याचे फारसे कौतुक वाटले नाही आणि एका मुस्लिम धर्मगुरूने दिलेली टोपी मोदींनी वापरण्यास नकार दिल्याच्या घटनेने आणखीच विवादाला सुरुवात झाली. काहीना ही उपोषणे म्हणजे केवळ प्रसिद्धीसाठी केलेला तमाशाही वाटला. गोध्र्याला उपोषण करावयाच्या वेळी काही कार्यकर्त्यांनी मोदींच्या विरुद्ध सभा घेण्याचे ठरविल्यामुळे काही जणांना अटकही करण्यात आलेली होती. मोदींनी स्वत: “मी ही उपोषणे कुठल्याही धर्माच्या समाजाला आकर्षित करून मते मिळविण्यासाठी केलेली नव्हती” हे स्पष्ट केले.
गुजरात राज्यातील ‘चमत्कारा’बाबतचे विवाद
मोदींनी ‘जोशीला गुजरात’ ही संज्ञा देऊन ‘एक ’गतिमान विकास, गतिमान आर्थिक वाढ व जलद भरभराट’ करू पाहणारे राज्य’ अशी गुजरात राज्याची नवी प्रतिमा निर्माण केली. पण अनेक टीकाकार तेथील मानवी विकास, गरिबी निर्मूलन (१३वा क्र.), कुपोषण व शिक्षण (२१वा क्र.) या बाबतीतील उणिवांकडे बोट दाखवितात. ४५ टक्के मुलांचे वजन आदर्श वजनापेक्षा कमी आहे २३ टक्के मुलांचे कुपोषण होत आहे हे दाखवून हे राज्य भुकेच्या निर्देशांकाच्या बाबतीत “भयावह” श्रेणीत असल्याचे नमूद करतात. या उलट राज्याचे अधिकारी २००१-२०१० दरम्यान स्त्री-शिक्षण व तत्सम अनेक मानवी मूल्यांबाबत गुजरात संपूर्ण भारताच्या तूलनेत पुढे आहे असे प्रतिपादन करतात. शाळा सोडून देणाऱया विद्यार्थ्यांचे प्रमाण २००१-२०११ दरम्यान २० टक्क्यावरून २ टक्क्यावर आलेले असून याच कालावधीत मातृत्वापायी होणाऱया मृत्यूंचे प्रमाण ३२ टक्क्यांनी कमी झाल्याचाही दावा करतात.
अनेक अर्थशास्त्रज्ञांच्या मते गुजरातमधील प्रगतीच लाभ मुख्यत्वे शहरी मध्यमवर्गीयांना झालेला असून ग्रामीण रहिवाशांना व खालच्या जातीतील लोकांना या प्रगतीचा काहीच लाभ झालेला नाही. ग्रामीण भागात विकास पुरेसा झालेला नसल्यामुळे गुजरात राज्य मानवी विकसनाच्या बाबतीत भारताच्या २८ राज्यांत २१ व्या क्रमांकावर आहे. गरिबी रेषेखाली रहाणाऱयांची संख्याही वाढलेली आहे, खास करून ग्रामीण आदिवासी व दलित वर्गात!
अमर्त्य सेन यांचेही मोदींच्या कारभाराबद्दल चांगले मत नाही कारण त्यांच्या कालावधीत शिक्षण व आरोग्य याबाबतीत प्रगती चांगली झालेली नाही. याविरुद्ध काही अर्थतज्ज्ञांनुसार गुजरातचा सामाजिक निर्देशांक इतर राज्यांच्या मानाने नीच पातळीपासून खूप वर आलेला आहे. इतर राज्यांपेक्षा साक्षरतेचे प्रमाण खूपच जास्त सुधारलेले असून आरोग्याच्या बाबतीतसुद्धा इतर राज्यांच्या तुलनेत गुजरातमध्ये खूपच जलद प्रगती झालेली आहे.
पण ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ “ब्रिक[१५] रिपोर्ट”चे लेखक जिम ओनील आपल्या ब्लॉगवर लिहितात की, “मोदी हे चांगले अर्थतज्ज्ञ आहेत आणि आज भारताला अशा अर्थतज्ज्ञांची नितांत आवश्यकता आहे. ऑगस्ट २०१३ मध्ये वित्तीय विश्लेषक आणि Crédit Lyonnais Securities Asia (CLSA) या दक्षिण-पूर्व विभागातील स्वतंत्र दलाली व गुंतवणूकविषयक सेवा देणाऱया सर्वात मोठ्या संस्थेचे प्रमुख सल्लागार ख्रिस वूड यांनी आपल्या साप्ताहिक Greed & Fear या स्तंभलेखात लिहिले होते कीं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड होणे ही भारताच्या रोखेबाजाराची सर्वात मोठी आशा आहे आणि सप्टेंबरमध्ये तसे झालेही व रोखेबाजार कडाडलासुद्धा!
असो. आता घोडेमैदान जवळ आहे पण अद्याप घास तोंडात जायचा आहे. माझ्यासारखे अनेक भारतीय मतदार मोदी पंतप्रधानपदावर येतील व भारताला नव्या दिशेने नेतील अशी आशा बाळगून आहेत.
मोदींच्या अंबानी व अडानी या उद्योगसमूहांशी असलेल्या जवळिकीबद्दल केजरीवाल नेहमीच हल्ला करत असतात. पण त्याबद्दल अद्याप तरी कुठलाच पुरावा पहाण्यात/वाचनात आलेला नाहीं.
पुढील लेख मोदींना प्रसारमाध्यमांकडून मिळणाऱया सावत्र वागणुकीबद्दल असेल.
ऋणनिर्देश:
· आकडेवारी व माहिती विकीपीडियावरून व माझ्या गुजरातमधील मित्रांच्याकडून घेतली आहे.
· श्री निलंजन मुखोपाध्याय यांच्या “The anatomy of Narendra Modi – the man and his politics” या पुस्तकावरील “इंडिया टुडे”च्या संस्थळावरील लेख. मी स्वत: हे पुस्तक अद्याप वाचलेले नाहीं पण नक्की वाचणार आहे. मुखोपाध्याय गुजरातच्या यशोगाथेचे अंध प्रशंसक नाहींत तर ते या यशोगाथेची प्रशंसा का करतात याचे त्यांनी या पुस्तकात आकडेवारीने विवरण केलेले आहे व मोदींच्यावरील हे पुस्तक म्हणजे राजकीय पत्रकारितेचे एक उत्कृष्ठ उदाहरण समजले जाईल असे या लेखात लिहिले आहे. ज्यांना मोदींच्या झंझावाती प्रगतीमागची कारणे समजून घ्यायची असतील त्यांनी हे पुस्तक जरूर वाचले पाहिजे. (http://indiatoday.intoday.in/story/narendra-modi-sold-tea-at-vadnagar-station-says-new-book/1/286117.html)
· आंतरजालावरून व अनेक संस्थळांवरूनही बरीच माहिती जमविली आहे.
टिपा:
 [१] भाजपाचे National Executive Council
[२] वैयक्तिक पातळीवर मला तरी असे वाटते कीं पंतप्रधान झाल्यावरही मोदींनी अमेरिकेला पहिल्या पाच वर्षांत अजीबात जाऊ नये. उलट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाच भारतात यावयास आमंत्रण द्यावे व जर दुसरी ५ वर्षांची मुदत मिळाली तरच अमेरिकेला जायचा विचार करावा.
[३] त्यांनी निधर्मीपणाची जी आपली नवी व योग्य “भारत सर्वांत आधी” ही व्याख्या मला स्वत:ला तर खूप पटते व आवडते.
[४]http://timesofindia.indiatimes.com/india/Clerics-slam-Vastanvi-for-Modi-praise/articleshow/7330722.cms
[५] भाषावार प्रांतरचनेच्या आधी गुजरात, कर्नाटक व महाराष्ट्र यातील कांहीं भाग मिळून मुंबई राज्य बनविण्यात आलेले होते.
[६] मला हे माहीत असायाचे कारण म्हणजे रा.स्व.संघाचे कांहीं प्रचारक माझ्या माहितीचे आहेत.
[७] ते स्वत:सुद्धा आपल्याला हिंदू राष्ट्रवादी समजतात.
[८] Vibrant Gujarat
[९] याच काळात नजमा हेपतुल्लासारख्या नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
[१०] Non-Governmental Organisations (NGOs)
[११] Rainwater harvesting etc
[१२] Water table (मूळ लेखातील चित्र पहा)
[१३] त्या मानाने इतर राज्यांत भूमीखालील स्तरावरील पाण्याची पातळी खाली जात आहे.
[१४] genetically-modified
[१५] ब्राझिल, रशिया, भारत व चीन (Brazil, Russia, India and China) या झपाट्याने विकसत असलेल्या चार राष्ट्रांना BRIC या संक्षेपाक्षरांनी ओळखले जाते.
संकलक-लेखक – सुधीर काळे, जकार्ता
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)