गेल्या काही दिवसांत भारतीय जनमानसात दोन ज्येष्ठांनी त्यांच्या प्रतिमेला छेद देणारे, निराश करणारे तरंग उमटवले. त्यातले पहिले आदरणीय लालकृष्ण अडवाणी आणि दुसरे आदरणीय अण्णा हजारे. इथे मी आदरणीय शब्द अत्यंत गांभीर्याने, सच्चेपणाने वापरत आहे. पुढाऱ्याला वाढदिवसाच्या बॅनरवर आदरणीय लिहितात तशा खोटेपणाने नाही.
अडवाणी म्हणजे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी, भावनेने भाजपशी बांधील असलेल्या प्रत्येक मतदाराकरिता प्रात:स्मरणीय. मुलाला जसे आपले वडील हीरो वाटतात तसे प्रत्येक कार्यकर्त्यांला त्यांच्याबद्दल पूज्यभाव आहे. काही सार्वजनिक क्षेत्रात अशी उत्तुंग व्यक्तिमत्त्वे असतात की त्यांच्याबद्दल त्यांच्या पाठीराख्यांच्या मनात my leader can never be wrong अशी पूर्ण समर्पित श्रद्धा असते. अडवाणी त्या काही मोजक्या नेत्यांपैकी एक. अत्यंत सुसंस्कृत, संयत, सुशील आचारविचारांनी घडलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व कार्यकर्त्यांचा आदरभावच नाहीतर शरणभाव मिळवून गेले. चांगला नेता अनेक पाठीराखे मिळवतो. पण ग्रेट नेता तो असतो जो अनेक नवीन, कर्तबगार नेते घडवतो. अडवाणींनी भाजपचे बीज अटलजींबरोबर नुसते रुजवले नाहीतर सुषमा, जेटली, मोदी, महाजन, उमा भारती यांसारखी फलसंपत्ती भाजप वृक्षावर बहरू दिली. पक्व केली. आज भाजपची कमान या शिष्योत्तमांच्या हाती सोपवताना मात्र अडवाणी प्रपंचाकडून परमार्थाकडे जाण्याकरिता धजावत नाहीत. २००९च्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून भाजप ११६ जागांवर स्थिरावला. सरकार स्थापनेपासून अनेक मैल दूर, नवीन तरुण मतदारांना आकर्षित करण्याकरिता नवीन कल्पनेचा, ताज्या दमाचा, धडाडीचा, जनतेत स्वाभिमानाचे स्फुल्लिंग जागृत करणारा नेता हवा हा धडा भाजपला मिळाला. त्यामुळे अडवाणींचा कोणत्याही प्रकारे अनादर न करता नवीन नेत्याचा राज्याभिषेक होणे पक्षाच्या अस्तित्वाकरिता सर्वात महत्त्वाचे होते. मोदींचे नेतृत्व त्या सर्व निकषांवर खरे उतरते हा संदेश लक्षात घेऊन पक्षाने त्यांना सर्वोच्च नेत्याचे पद दिले आणि ती निवड योग्य होती असे निवडणूक निकाल सांगतील असे बहुतेकांना वाटते. अडवाणींनी ज्या प्रकारे भाजपचे भरणपोषण नि:स्वार्थ बुद्धीने केले त्याच पित्याच्या आपुलकीने भाजपचा वेळू गगनावर गेलेला पाहावा, शिष्यांना प्रोत्साहन द्यावे, मार्गदर्शन करावे. डावलल्याची कलुषित भावना आणू नये. त्यांचे सर्व शिष्य त्यांचे ऋण कायम मानत आले आहेत.
अशाच प्रकारे थोडय़ा फार फरकाने दुखावले गेलेले ज्येष्ठ सुधारक अण्णा हजारे. दिल्लीतील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सरकारची खुर्ची गदागदा हलवणारे, पुढाऱ्यांना दु:स्वप्नामुळे झोप न येऊ देणारे, व्यवस्थेविरुद्धचा संपूर्ण भारताचा कंठनाद झालेले अण्णा. अण्णांना बऱ्याच जणांनी गांधींच्या पंक्तीत नेऊन बसवले तरी महाराष्ट्रातल्या जनतेला ते गाडगेबाबांचे रूप वाटतात. स्वच्छ आचारविचारांनी सामाजिक जळमटे झाडून टाकणारे अण्णा सर्वाना अभिप्रेत आहेत. दिल्लीच्या आंदोलनातील साथीदारांनी त्यांचा उपयोग शिडीसारखा करून घेतला आणि राजकीय दुकाने उघडली हे लक्षात आल्यावर अण्णा खवळले.
ज्या ज्याचा जो व्यापार। तेथे असावे खबरदार।
दुश्चितपणे तरी पोर। वेढा लावी ।।
अण्णांना आपले सहकारी फसवतील याची कल्पना आली नाही आणि एकदा फसवणूक लक्षात आल्यावर संधिसाधूंना धडा शिकवायचा या एकाच हेतूने प्रेरित होऊन त्यांनी राजकारण्यांना लाजवतील असे निर्णय घेतले. ममतांना स्वच्छ राजकारणीचे प्रशस्तिपत्रक देऊन टाकले. पंतप्रधानपदाकरिता पाठिंबा दिला. आपला उपयोग केला जातोय वाटल्यावर पुन्हा बाजूला झाले. आता भगतसिंगांच्या समाधीवर जाऊन श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. ते दुखावले गेले आहेत हे खरे असले तरी त्यांचा मार्ग सामाजिक सुधारणेचा आहे. नि:स्पृहपणे समाजोन्नतीकरिता काम करणारा तळमळीचा समाजसुधारक अशी त्यांची प्रतिमा आहे. सामाजिक सुधारणा करताना लबाडांशी संबंध येणारच. पण
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा ठेवता नाही आला तर माणसाप्रमाणे माणूस म्हणून अण्णांना इतिहास लक्षात ठेवेल. बारीकसारीक गोष्टींनी अहंकार दुखावून घ्यायचा आणि अशोभनीय, अकल्पित वर्तन करायचे. अण्णा, तुमच्यात आणि प्रवचन करणाऱ्या बाबा, स्वामी, महाराज यांत फरक आहे असे मानतो आम्ही.
तुमच्या नितळ, आरस्पानी कीर्तीस कोणतेही ग्रहण न लागता तुमचे ईश्वरदत्त कार्य अखंड चालू राहावे म्हणून आम्ही बघत आहोत तुमच्याकडे.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)