परवा भाजपच्या उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर झाली आणि त्यात नवज्योतसिंग सिद्धूची विकेट भाजपने काढल्याचे जाहीर केले. आता सिद्धूच्या जागी अमृतसरमधून अरुण जेटली लढणार असल्याचे जाहीर झाले. मी सिद्धूच्या प्रतिक्रियेकरिता आतुरतेने टीव्ही पाहात होतो. तेवढय़ात सिद्धूने दर्शन दिले. ‘माझी सीट पार्टीने अरुण जेटलींना द्यायचे ठरवले आहे. मला काही आक्षेप नाही. जेटलीजी माझे गुरू आहेत.’ (गुरूऽऽऽ ये तूने क्या किया हे फक्त मनात म्हणाला.) ‘पण लक्षात ठेवा, मी दुसरीकडून कुठूनही निवडणूक लढवणार नाही’. आता ही धमकी कुणाकरिता होती, माहीत नाही. कारण पार्टीला वाटतंय सिद्धूने काही वर्षे तरी एक्स्ट्रॉजमध्ये बसावे.
मला सिद्धू या माणसाचे कायम नवल वाटत आलेय. त्याचा १९८३ साली अहमदाबादला वेस्ट इंडिज विरुद्धचा डेब्यू आठवतोय. त्या मॅचमध्ये त्याने १९ धावा केल्या आणि त्या इतक्या कण्हत आणि कष्टाने. प्रचंड मर्यादा असलेला हा फलंदाज टीममध्ये कसा, हा प्रश्न कुणालाही पडला असता. ज्याने मारलेला बॉल एक्स्ट्रॉ कव्हरपर्यंत पोहोचत नाही तो माणूस भारतीय संसदेत पोहोचेल हे स्वप्नातही शक्य नव्हते. त्याची फलंदाजी बघून राजन बालाने त्याला ‘स्ट्रोकलेस वंडर’ म्हटले होते. सर्व बाजूंनी टीका झाल्यावर त्याने प्रयत्नपूर्वक स्वत:ला बदलले आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका वेगळय़ाच रूपात पेश झाला. तो इतका बदलला की स्पीनर आला की मार सिक्सर. कुणाला जन्मात वाटले नसेल की तो एकदिवसीय सामन्यात ४४ सिक्सर मारेल म्हणून. फिल्डिंग करताना वाकडेतिकडे ड्राईव्ह मारून बॉल अडवून तो जाँटी सिंग झाला. त्याचा हा सगळा बदलता अवतार म्हणजे मंद तेवणाऱ्या पणतीतून अचानक आगीचा लोळ बाहेर येण्यासारखे होते.
१६ वर्षे क्रिकेटमध्ये नाव कमावल्यावर तो टीव्ही पर्सनॅलिटी झाला. क्रिकेटकर असताना कधीही फारसा न बोललेला हा माणूस ज्या प्रकारे कॅमेऱ्यासमोर धमाल उडवून देऊ लागला, त्यामुळे दुसरा धक्का बसला. समालोचनाबरोबर दर दोन वाक्यांनंतर पेरलेले सुविचार, मुहावरे, म्हणी (त्यात मूळ हिंदी-पंजाबी म्हणींचे इंग्रजीत भाषांतर केलेले.) यामुळे प्रेक्षकांची करमणूक होऊ लागली. काहींना तर शंका येत होती की हा समालोचन करताना मांडीवर शब्दकोश घेऊन बसतो. तो इतका बोलत सुटतो की दुसऱ्याची अडचण होते. त्याच्या लोकप्रियतेकडे बघून भाजपने त्याला उमेदवारी दिली. तो दोनदा निवडून आला. पण संसदेतल्या त्याच्या सरासरी उपस्थितीपेक्षा त्याची फलंदाजीची सरासरी (टेस्टमध्ये ४२ आणि एकदिवसीय ३७) खूपच चांगली ठरली. क्रिकेट कॉमेन्ट्री, लाफ्टर चॅलेंज, बिग बॉस, कपिल शर्मा शो अशा सगळय़ाच कार्यक्रमांत तो चमकला. पण साधा उगवला पण नाही फारसा संसदेत. लोकसभेचा खासदार ही अतिशय महत्त्वाची चोवीस तासांची जबाबदारी आहे हे विसरणारा तो पहिलाच नाही. आपल्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी जेव्हा पाहावे तेव्हा टीव्हीवर मनोरंजनात लोळतोय, क्षुल्लक फालतू कारणांवर जोरजोरात हसतोय आणि स्वत:चे हसू करून घेतोय. १९ कोटीच्या मतदारसंघ निधीपैकी जेमतेम ९ कोटी वापरला जातोय. लोकांचा नुसता भ्रमनिरास नाहीतर संताप झाला होता. भाजपला हे माहीत होते. या वेळेस डच्चू निश्चित होता. महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांना न्याय देता येत नसेल तर तुमच्या हरहुन्नरी असण्याचे आम्हाला कौतुक नाही. हा संदेश अशा अनेक नट कम राजकारणी, खेळाडू कम राजकारणी यांना द्यायलाच हवा.
सिद्धू तू जसे करत होतास तसे टीव्ही शोज् भरपूर कर. आता आमची काही ना नाही.
काय सांगता, १६ मे ला निवडणूक निकाल लागतील तेव्हा सिद्धू न्यूज चॅनेलच्या स्टुडिओत बसून दंगा करेल आणि ओरडेल.
मैने आप को कहा था, काँग्रेस को सायकल स्टँड सिंड्रोम होगा। एक गिरतेही सब गिर जायेंगे गुरूऽऽऽ
रवि पत्की
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा