बोडो वस्तीच्या जिल्हय़ामध्ये विकासासाठी सहकार्य करीत नसल्याचा आरोप करीत बोडोलॅण्ड पीपल्स फ्रँट(बीपीएफ)ने काँग्रेससोबत आसाममध्ये २००१ सालापासून असलेली आघाडी गुरुवारी संपुष्टात आणली़  बोडो जनतेच्या आकांक्षा पूर्ण करता येत नसतील तर काँग्रेससोबतचे हे सरकार सुरू ठेवण्यात काहीच अर्थ नाही, असे बीपीएफचे प्रमुख हग्रामा मोहिलरी यांनी येथे पत्रकारांना सांगितल़े
मोहिलरी बोडोलॅण्ड टेरिटर कौन्सिलचेही प्रमुख आहेत़  बीपीएफच्या धोरणनिश्चिती समितीच्या बैठकीनंतर मोहिलरी यांनी सांगितले की, सध्याचे काँग्रेस शासन गेली अनेक वष्रे सत्तेत असूनही बोडोंना जीवित आणि वित्ताच्या सुरक्षिततेची शाश्वती देण्यास अपयशी ठरले आह़े  राज्य शासनाकडून मिळणाऱ्या निधीपासूनही बोडोलॅण्ड कायम वंचित राहिले आह़े  
आसामच्या १२६ सदस्यांच्या विधानसभेत बीपीएफचे १२ सदस्य आहेत़  त्यापैकी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या कॅबिनेटमध्ये केवळ चंदन ब्रह्मा हे एकमेव सदस्य आहेत़  त्यांच्याकडे वाहतूक, पर्यटन आणि बोडो भागातील अनुसूचित जाती – जमाती कल्याण अशा खात्यांचा कार्यभार आह़े