सर्व समाजाच्या हिताचे कार्य करणारा बहुजन समाज पक्ष निवडणुकीनंतर केंद्रात सत्तासमतोल साधणारी शक्ती बनू शकेल, असा विश्वास बसपच्या अध्यक्ष मायावती यांनी येथील जाहीर सभेत व्यक्त केला.
येथील सायन्स कोर मैदानावर आयोजित राज्यातील पहिल्या प्रचारसभेत बोलताना मायावती यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनाही त्यांनी लक्ष्य केले. मायावती म्हणाल्या, गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात जातीय दंगली उसळल्या. भाजपने त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून समोर केले आहे. चुकून ते पंतप्रधान बनले, तर संपूर्ण देश जातीय दंगलींमध्ये होरपळून उद्ध्वस्त होईल. दुसरीकडे, काँग्रेस पक्षाने जाहीर न करतादेखील ‘युवराज’ राहुल गांधींना पंतप्रधान मानून प्रचार सुरू केला आहे. काँग्रेसच्या ५० वर्षांच्या शासनकाळात जनतेच्या हितासाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्यांना आता मते मागण्याचा हक्क उरलेला नाही.
काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यावर टीका करताना मायावती म्हणाल्या, काँग्रेसने जनतेची दिशाभूल करण्याचाच सातत्याने प्रयत्न केला आहे, त्यामुळे निवडणूक काळातील आश्वासनांवर जनतेने विश्वास ठेवू नये. बसप निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करीत नाही, प्रत्यक्ष कृती करण्यावर पक्षाचा विश्वास आहे. कांशीराम यांनी ‘बामसेफ’ची चळवळ सर्वप्रथम महाराष्ट्रातूनच उभी केली होती. त्यांच्या हयातीत महाराष्ट्रात बसपाची सत्ता येऊ शकली नाही. संसदेत बसपचा महाराष्ट्रातून एकही प्रतिनिधी गेला नाही. दुसरीकडे उत्तरप्रदेशाने त्यांचे स्वप्न पूर्ण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपूर्ण ‘मिशन’ला ‘मंजील’पर्यंत नेण्यासाठी आता सर्व शक्ती पणाला लावावी लागेल, असे मायावती म्हणाल्या.
मायावतींना थंडावा तर समर्थकांना उन्हाचा तडाखा
नाशिक:देशातील गरिबी, भ्रष्टाचार आणि जातीय राजकारण आदी विषयांवरून वातानुकूलीत यंत्राच्या थंडगार हवेचा आनंद घेत विरोधकांवर टिकास्त्र सोडणाऱ्या बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी नाशिककरांना जवळपास तीन तास टळटळीत उन्हात त्यांची प्रतीक्षा करणाऱ्या समर्थकांविषयी मात्र एक शब्दही काढला नाही. तीन तासाच्या विलंबाबद्दल क्षमा देखील न मागता उन्हातान्हात बसून त्रस्तावलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी थंडगार हवेचे झोत घेत उपदेशाचे डोस पाजले. बसपा हा एकमेव पक्ष सर्वसामान्यांसाठी कसा कार्यरत असतो, याची उदाहरणे त्यांनी दिली. उन्हात प्रदीर्घ काळ व्यतीत करणाऱ्यांना त्याची खऱ्या अर्थाने जाणीव झाली.सभेची वेळ भर दुपारची असल्याने व्यासपीठावर मायावती यांना उन्हाची झळ बसू नये याची पुरेपूर दक्षता घेण्यात आली होती. दिनकर पाटील यांच्या प्रचारासाठी त्या आल्या होत्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा