दिल्लीच्या तख्ताचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, त्यामुळेच नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशवर अधिकाधिक लक्ष दिले. एकीकडे मोदींना रोखण्याचे आव्हान असतानाच सत्ताधारी समाजवादी पक्षाला मुझफ्फरनगरातील जातीय दंगलींचा सामना करावा लागला. मात्र, दोन्ही ठिकाणी अपयश आल्याने निवडणुकीत समाजवादी पक्षाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. तर दुसरीकडे दलित मतपेटीच्या जोरावर आपल्याला याहीवेळी चांगले यश मिळेल या भ्रमात असलेल्या बसपच्या अध्यक्ष मायावती यांचे मतदारांनी डोळे उघडले. उत्तर प्रदेशात आळीपाळीने सत्ता स्थापणाऱ्या मुलायम आणि मायावती या दोन्ही नेत्यांना राज्यातील मतदारांचे मन अखेपर्यंत ओळखताच आले नाही, असेच म्हणावे लागेल.
मुझफ्फरनगरमधील दंगली हाताळण्यात मुलायमन यांच्या तुलनेत नवख्या असलेल्या अखिलेश यांना अपयश आल्याने मुस्लिम मतपेटीवर अवलंबून असलेल्या समाजवादी पक्षाला चांगलाच फटका बसला. त्यामुळे मुस्लिम मतदार समाजवादी पक्षापासून दुरावला. तर मायावतींनाही मतदारांनी झिडकारले. उठताबसता दलितांच्या बाजूने उच्चरवाने बोलणाऱ्या मायावतींनी प्रत्यक्षात सत्ता असताना दलितांसाठी काहीच न केल्याने रागावलेल्या मतदारांनी त्यांनाही जागा दाखवून दिली. त्यामुळे निकालांपूर्वी तिसऱ्या आघाडीसाठी चाललेल्या सपा-बसपाच्या हालचाली आता मंदावणार आहेत, हे नक्की. उत्तर प्रदेशमधील भाजपची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी १९९८ मधील ५७ जागांची होती. यंदा मोदीलाटेमुळे मात्र हा आकडा आता ७१ झाली आहे.

Story img Loader