लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच राज्याच्या जवळपास निम्म्या भागाला गारपीटीचा फटका बसल्याने झालेल्या मोठय़ा प्रमाणावरील नुकसानीमुळे सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोपच उडाली आहे. काहीही करून लवकरात लवकर जास्त मदत मिळावी, असा धोशा सत्ताधारी नेत्यांनी लावला आहे. ही पाश्र्वभूमी लक्षात घेऊनच नेहमीपेक्षा वाढीव मदत देण्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सूचित केले.
गारपीटमुळे नुकसान झालेल्या भागांचा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दौरा सुरू केला आहे. जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन पवार यांनी शेतकऱ्यांना दिले आहे. गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही आठवडा उलटला तरी सरकार गंभीर नाही, अशी टीका विरोधकांनी सुरू केली. राज्यातील सुमारे १५ लाख हेक्टर्स क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतीचे मोठय़ा प्रमाणावर झालेल्या नुकसानीच्या पाश्र्वभूमीवर शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन फळबागांसाठी हेक्टरी ५० हजारांच्या मदतीची मागणी केली.
गारपीट आणि अवकाळी पाऊस यामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा मुख्यमंत्री चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत घेतला. मदत व पुनर्वसन सचिव मििलद म्हैसकर यांनी नुकसानीची आकडेवारी व सारी माहिती सादर केली. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्यांना किती मदत द्यायची याबाबत निकष निश्चित करण्यात आले आहेत. ही मदत फारच अपुरी असल्याने ती वाढवून द्यावी, अशी सर्वच लोकप्रतिनिधींची मागणी आहे. विशेषत: निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना पुरेशी मदत न दिल्यास त्याचा मतदानात फटका बसेल, अशी भीती सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना भेडसावत आहे.
सध्या देण्यात आलेल्या मदतीत वाढ करण्याची योजना असल्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले. पुढील दोन दिवस आपण मराठवाडा आणि विदर्भातील गारपीटग्रस्त भागातील नुकसानीचा आढावा घेणार आहोत.
या दौऱ्यानंतरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणत्या पिकासाठी किती मदत द्यायची याचा निर्णय घेतला जाईल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. सध्या आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक आयोगाशी चर्चा करूनच मग वाढीव मदतीचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Story img Loader