रस्त्यांचा जटील प्रश्न, महापालिकेतील गचाळ कारभार, शिवसेनेतील धुसफूस थांबवताना होणारी कसरत दिसू न देण्याची खासदार चंद्रकांत खैरे यांची केविलवाणी धडपड एका बाजूला आणि जात हा प्रमुख मुद्दा मानून निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नितीन पाटील यांचा प्रचार दुसऱ्या बाजूला, अशा लोलकावर औरंगाबाद लोकसभेचे राजकारण सुरू आहे. या वेळच्या लढतीत मोलकरणी आणि कामगारांचे प्रश्न लावून धरणाऱ्या आपचे उमेदवार सुभाष लोमटे यांच्यासह तब्बल २७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. एक मात्र नक्की की, सेनेच्या बालेकिल्ल्यात खैरेंना अडचणी निर्माण झाल्या आहेत.
काँग्रेसच्या ज्येष्ठांनी स्थानिकांच्या घरी उमेदवारी घ्या हो, असे साकडे घालत प्रदक्षिणा घातल्या. मंत्री राजेंद्र दर्डा, आमदार कल्याण काळे यांनी उमेदवारी नकोच असे सांगत अंग चोरून घेतल्याने अखेर पाटील यांच्या गळ्यात काँग्रेसने माळ घातली. जिल्हा बँकेतील नोकरभरती घोटाळ्याचा आरोप असणाऱ्या पाटील यांच्या कारभारावर अजून शिवसेनेने तशी टीका सुरू केली नाही. तुलनेने रस्त्यांच्या प्रश्नी खैरेंना मात्र खुलासे करावे लागत आहेत.
प्रचाराला रंग चढण्यापूर्वी वेरूळच्या शांतिगिरी महाराजांची भूमिका काय, याचे आडाखे बांधले जात होते. मात्र, सुदर्शन वाहिनीच्या उपस्थितीत त्यांनी गोरक्षणासाठी झटणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केल्याने खैरेंची खेळी यशस्वी झाल्याची चर्चा आहे. शांतिगिरी महाराजांनी गेल्या निवडणुकीत खैरेंच्या विरोधात सुमारे दीड लाख मते घेतली. या वेळी त्यांचा कल ठरविताना राष्ट्रवादाचे कारण पुढे केले. कन्नड, वैजापूर विधानसभा मतदारसंघांत ‘छत्रपतींचा विजय असो’ हा नारा दिला जात आहे. काँग्रेसचे उमेदवार पाटील ‘९६ कुळी’ असल्याचा उल्लेख वैजापूरचे राष्ट्रवादी कार्यकत्रे भाऊसाहेब चिकटगावकर यांनी जाहीर भाषणात केला. त्यामुळे जातीच्या अंगाने होणाऱ्या काँग्रेसच्या प्रचारात मुद्दे असे नाहीत.
पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रस्त्यांच्या प्रश्नावरून खैरेंना लक्ष्य करताना, ‘शहरातून फिरायचे असेल तर झंडू बाम घेऊनच यावे लागते’ असा टोला लगावला. हळूहळू प्रचारातील आरोप-प्रत्यारोपांची राळ उठू लागली आहे. नवीन मतदारांची वाढलेली संख्या आणि जाती-पातीच्या पारंपरिक मतदानाच्या पद्धतीवरच प्रमुख उमेदवारांचे लक्ष असले, तरी २७ उमेदवारांत समाजवादी पक्षाचे सदाशिवराव गायके व आपचे सुभाष लोमटे किती मते घेतील, यावरही बरेच अवलंबून असेल.
काँग्रेसमध्ये बंडखोरीच्या तयारीत असणाऱ्या उत्तमसिंह पवार यांनी पीछे मूड केले. दर्डा, थोरात या मंडळींनी जोर लावला. मात्र, उमेदवाराचा शहरी भागातील संपर्क व भाषा यावरून सुरू झालेल्या चच्रेस अजून काँग्रेसला उत्तर देता आले नाही. या निवडणुकीत जिल्हा बँकेतील गरव्यवहार नव्याने चच्रेत येण्याची शक्यता आहे. दंगल होऊ दिली नाही, हा प्रचार शिवसेना जाणीवपूर्वक करीत आहे. निजाम राजवटीतील दाखले देताना मुस्लिमांचा काँग्रेसकडून होणारा अनुनय हादेखील शिवसेनेच्या प्रचाराचा मुद्दा असला, तरी रस्ते व समांतर पाणीयोजनेचे ढेपाळलेले गणित शिवसेनेला जड जात आहे.
काँग्रेसने कधीही जातीचा आधार घेतला नाही. धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. जिल्ह्यात पक्षाची परिस्थिती चांगली आहे. खैरे यांनी एकही काम चांगले केले नाही. त्यामुळे जनभावना त्यांच्या विरोधात आहे. ती मते असल्याने निवडून येण्याची खात्री आहे.
– नितीन पाटील (आघाडी)
जाती-पातीचे राजकारण औरंगाबाद मतदारसंघात चालत नाही. काँग्रेसकडून काही तरी खेळ्या केल्या जातात; पण मतदार त्याकडे लक्ष देत नाहीत. शिवाय सर्वत्रच काँग्रेसविरोधी लाट आहे. त्यामुळे निवडणुकीत विजय मिळेलच.
– चंद्रकांत खैरे (महायुती)