फेसबुकचा वापर करणाऱ्यांना पुढील महिन्यापासून देशातील दिग्गज राजकीय नेत्यांकडूनच त्यांच्या निवडणूक कार्यक्रमाबाबतची माहिती जाणून घेता येणे शक्य होणार आहे. लोकसभेच्या आगामी निवडणुका जवळ येत असतानाच आता फेसबुकचा वापर करणाऱ्यांना नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, लालूप्रसाद यादव, अरविंद केजरीवाल या नेत्यांना थेट प्रश्न विचारता येणार आहेत.
‘फेसबुक टॉक्स लाइव्ह’द्वारे फेसबुकचा वापर करणाऱ्यांना दिग्गज नेत्यांना थेट प्रश्न विचारता येणार आहेत. देशाचा कारभार आपण कशा पद्धतीने करणार आणि आपले प्राधान्यक्रम काय आहेत, याबाबतचे थेट प्रश्न फेसबुकचा वापर करणाऱ्यांना विचारता येणार आहेत, असे फेसबुकचे सार्वजनिक धोरण संचालक (भारत व दक्षिण आशिया) अंखी दास यांनी सांगितले.सोशल नेटवर्किंगच्या संकेतस्थळावरील समर्पित पेजवर राजकीय नेत्यांसाठी प्रश्न पाठविण्याची सुविधा गुरुवारपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. फेसबुकचा वापर करणाऱ्यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार मधू त्रेहान या सत्राची सुरुवात करणार आहेत. खासगी दूरचित्रवाणी वाहिनीवरूनही त्याचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.या सत्रासाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी पहिले पाहुणे असून ३ मार्च रोजी त्याची सुरुवात होणार आहे. पक्षाची धोरणे, विविध विषयांवरील त्यांची भूमिका आणि मते या वेळी फेसबुकचा वापर करणाऱ्यांना विचारणे शक्य होणार आहे. भारतात दरमहा ९३ दशलक्षहून अधिक जण फेसबुकचा वापर करण्यात सक्रिय आहेत.

Story img Loader