राष्ट्रवादीत नाराज असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर असल्यावर ‘लोकसत्ता’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर ज्या जिल्ह्याचे व विधानसभा मतदारसंघाचे ते सध्या प्रतिनिधीत्व करतात, त्या नाशिक व येवल्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले. भुजबळांचे निकटवर्तीय म्हणून गणली जाणारी मंडळी तसेच शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनीही ते शिवसेनेत येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे, अशा शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर खुद्द भुजबळ यांनी जातीयवादामुळे पराभव झाल्याचे म्हटले होते. या निकालानंतर त्यांनी स्थानिक राजकारणात फारसे लक्ष्य दिले नव्हते. परिणामी, नाशिक शहराध्यक्षपदाचा तिढा अनेक दिवस रेंगाळल्यानंतर अलीकडेच सुटला. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, भुजबळ पक्षाच्या कामात पुन्हा सक्रिय झाले. लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये म्हणून त्यांनी तालुकावार बैठकांचे सत्र सुरू केले. हे सारे घडत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीत आपली घुसमट होत असल्याची त्यांच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांची भावना झाल्याचे जाणवत होते. त्यातच, भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त आल्यानंतर या संदर्भातील चर्चानी अधिकच जोर पकडला.
या संदर्भातील वेगवेगळ्या संदेशांची पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून ‘वॉट्स अप’वर देवाणघेवाण सुरू होती. भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातही याबाबत विविध प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. विधानसभा निवडणुकीत भुजबळांशी दोन हात करणारे शिवसेनेचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी ते पक्षात येणार असतील, तर त्यांचे स्वागत आहे, असे म्हटले आहे. विधानसभेच्या उमेदवारीसाठी अलीकडेच राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेल्या येवला पंचायत समितीचे सभापती संभाजी पवार यांनी असे काही घडणार नसल्याचे सांगून पण त्यांचे शिवसेनेत स्वागत आहे, अशी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली.
भुजबळांच्या निकटवर्तीयांमध्ये समावेश असलेल्या, पण सध्या सेनेशी जवळीक साधणारे म्हाडाचे नाशिक विभागीय अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी ‘साहेब शिवसेनेत जात असतील, तर आपणही सेनेत जाऊ’ असे म्हटले आहे. भुजबळांचे कट्टर समर्थक अंबादास बनकर यांनी भुजबळ हे शिवसेनेत जाणार नाहीत. पण तसे घडल्यास ही बाब दुदैवी असेल असे सांगितले. एकूणच भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्यात या विषयावर वेगवेगळ्या चर्चाचा फड रंगला
आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा