राज्यातील नेत्यांना व विशेषत: सत्तेची उब मिळालेल्या नेत्यांना दिल्लीपेक्षा मुंबईच बरी वाटते. मुंबईतील मंत्रिपदाची झूल सोडून दिल्लीत जायचे म्हणजे एकप्रकारे शिक्षाच. सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत सध्या असेच काहीसे झाले आहे. लोकसभा निवडणूक लढण्याची भुजबळांची शेवटपर्यंत इच्छा नव्हती. आपले पुतणे समीर दिल्लीत तर आपण मुंबईत बरे हे वारंवार ते सांगत होते. पण पक्ष नेतृत्वाने भुजबळांचे काही मनावर घेतले नाही. शेवटी भुजबळांच्या गळ्यात उमेदवारी टाकण्यात आली. पूर्वीची रग गेल्याने म्हणा किंवा वयोमान लक्षात घेता भुजबळांना पक्षनेतृत्वाचे ऐकण्याशिवाय पर्याय राहिला नाही. नाशिकची जहागिरी कायम ठेवण्याकरिता भुजबळांना भर उन्हात गल्लीबोळांमधून फिरावे लागत आहे. नाशिकमधील प्रचार सभेत शरद पवार यांच्या भाषणामुळे भुजबळांना अधिकच बळ आले आहे. कारण पवार यांनी भुजबळांना मधाचे बोट तर लावले आहे. मी राज्यसभेत गेल्याने लोकसभेतील माझी जागा आता भुजबळ घेतील, असे पवार यांनी सांगितले. हे सांगतानाच प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे या दिल्लीचा अनुभव असलेल्यांच्या तुलनेत भुजबळ हे अनुभव, कर्तृत्व आणि प्रशासनाच्या बाबत श्रेष्ठ असल्याचे प्रमाणपत्रही दिले. दोन क्षण भुजबळांनाही हायसे वाटले असणार. पण हे सारे जर-तरवर अवलंबून आहे. केंद्रातील सत्तेत राष्ट्रवादी भागीदारच नसल्यास काय, हा विचार साहजिकच भुजबळांच्या मनात शिवला असणार. माजी मुख्यमंत्र्याला साधा खासदार म्हणून दिल्लीत मंत्र्याच्या तोडीचा प्रशस्त बंगला मिळतो. उपमुख्यमंत्री हे घटनात्मक पद नसल्याने अशांना दिल्लीत मानाचे स्थान नाही. म्हणजेच पहिल्यांदा खासदार म्हणून छोटय़ा बंगल्यात राहावे लागणार. बरे, सत्तेत वाटा मिळाला तरी स्वत: शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांना महत्त्वाची खाती आहेतच. राष्ट्रवादीचे खासदार किती निवडून येणार, त्यात किती मंत्रिपदे वाटय़ाला येणार हे सारेच अधांतरी आहे. राज्यसभेत निवडून गेलो म्हणून मंत्रिपद भूषविणार नाही हे पवार यांनी अजून तरी जाहीर केलेले नाही. नाशिकमध्ये निवडून येण्यासाठी पवार यांनी भुजबळांची स्तुती करीत त्यांना बळ मिळण्याची व्यवस्था केली की नाराज भुजबळांना मधाचे बोट लावले याची चर्चा तर होणारच !

Story img Loader