राष्ट्रवादीने आपल्या २२ पैकी १८ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करताना सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब केले. खुनाचा आरोप असलेले डॉ. पद्मसिंह पाटील आणि जात प्रमाणपत्राचा वाद झालेल्या नवनीत कौर राणा यांना उमेदवारी देऊन वादग्रस्त चेहऱ्यांना संधी दिली आहे.
विद्यमान आठ खासदारांपैकी समीर भुजबळ यांना पक्षाने उमेदवारी नाकारली तर स्वत: शरद पवार यांनी राज्यसभेचा मार्ग पत्करला. साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या पुन्हा उमेदवारी देण्यास पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी विरोध दर्शविला होता. काही मंत्र्यांना लोकसभेची निवडणूक लढवावी लागेल, असे पवार यांनी जाहीर केले होते. पहिल्या यादीत फक्त भुजबळ यांचाच समावेश आहे. रायगड मतदारसंघ वाटय़ाला आल्यास सुनील तटकरे यांना उभे करण्याची योजना आहे. पवनराजे निंबाळकर खून खटल्यात खासदार डॉ. पद्मसिंह पाटील हे आरोपी असून, खटला अद्याप निकालात निघालेला नाही. तरीही पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली आहे. अमरावती (राखीव) मतदारसंघातून राष्ट्रवादीने अपक्ष आमदार रवि राणा यांची पत्नी नवनीत कौर राणा यांना उमेदवारी दिली आहे. अभिनेत्री असलेल्या राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा वाद झाला आहे. दक्षता समितीनेही त्यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा निर्वाळा दिला आहे.  
 उमेदवारीत घराणेशाही
शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे (बारामती), माजी मंत्री व आमदार ए. टी. पवार यांची सून डॉ. भारती (दिंडोरी), खासदार ईश्वर जैन यांचे पुत्र मनीष (रावेर), ठाणे जिल्हाचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक (ठाणे), काँग्रेसचे आमदार महादेव महाडिक यांचे पुतणे मुन्ना (कोल्हापूर) या नातेवाईकांना उमेदवारी मिळाली आहे. माढा मतदारसंघात नेत्यांचा विरोध डावलून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.