कोणत्या जातीत जन्माला यावे हे कोणाच्या हातात नसते. विरोधकांना आपल्याविरोधात कोणताही मुद्दा सापडत नसल्याने त्यांना जातीयतेचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळेच ताकही फुंकून प्यावे लागण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी समर्थकांनी गावागावांमध्ये जाऊन मते जाणून घेण्याची सूचना नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येथे केली.
भुजबळ यांनी विधानसभा निवडणूक पुन्हा एकदा येवला मतदारसंघातूनच लढवावी, या मागणीसाठी रविवारी येथे समर्थकांनी बैठकीचे आयोजन केले होते. मतदारसंघातून सुमारे दीड हजार समर्थक या वेळी उपस्थित होते. नाशिक लोकसभा मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर भुजबळ यांची ही केवळ दुसऱ्यांदा येवला भेट होती. या वेळी बोलताना भुजबळ यांनी उमेदवारीसह विविध मुद्दय़ांना स्पर्श केला. परिस्थिती कधीच एकसारखी नसते. काँग्रेसमधून शरद पवार बाहेर पडल्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले, परंतु निकालानंतर आपल्या प्रयत्नांमुळे दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र आले होते, असा दाखला देत केंद्र आणि राज्यासाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये असलेली भिन्नता भुजबळ यांनी मांडली. मराठा आरक्षणाला आपला कधीही विरोध नव्हता. विकासाचे राजकारण आपण केले. आपल्यासाठी अनेक मतदारसंघ आहेत, परंतु निवडणूक लढविणे आवश्यकच आहे असे नाही. आपल्या उमेदवारीविषयी शरद पवारच निर्णय घेतील. तुम्ही गावागावांत जाऊन जनमताचा कानोसा घ्या, त्यानंतरच आपण निर्णय जाहीर करू, असे नमूद करीत भुजबळ यांनी उमेदवारीचा चेंडू समर्थकांच्या दरबारात टाकला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आंबादास बनकर, संतुपाटील झांबरे, विश्वासराव आहेर उपस्थित होते.

Story img Loader