काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीविरुद्ध महायुतीच्या महाएल्गार सभांचा धडाका सुरू असतानाच, लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून मात्र घटक पक्षांमध्ये असंतोष भडकू लागला आहे. रिपब्लिकन पक्षासाठी सातारा मतदारसंघ सोडल्याचे शिवसेनेने परस्पर जाहीर केल्याने आठवलेंचे कार्यकर्ते नाराज आहेत. तर, माढासाठी हटून बसलेल्या महादेव जानकर यांना बारामतीचा रस्ता दाखविल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या नेत्यांविरुद्ध घोषणाबाजी करून असंतोष व्यक्त केला़
जागा वाटपात राजू शेट्टी यांच्या मागणीनुसार त्यांच्या पक्षाला माढा व हातकणंगले हे दोन मतदारसंघ देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे शेट्टींना झुकते माप आणि आठवले व जानकरांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याबद्दल या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
भाजपने आठवले यांना राज्यसभेची खासदारकी देऊन लोकसभेच्या जागांचा विषय आपल्यापुरता बंद करून टाकला. आठवले यांनी मागितलेल्या वर्धा, पुणे, लातूर, या जागा सोडायला भाजपने स्पष्ट नकार दिला़ त्यांचे उमेदवारही निश्चित झाले आहेत, फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. आठवले यांनी माढावर दावा केला होता. परंतु हा मतदारसंघ शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेला देण्याचे निश्चित झाल्याने आठवले व समर्थक नाराज झाले आहेत.
रिपाइंचा उमेदवार शिवसेना ठरविणार
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी आठवलेंनी सातारा मतदारसंघ मागितला होता. परंतु उदयनराजे हे महायुतीत येणार की नाही, याबद्दल अनिश्चितता होती. मात्र दोन दिवसांपूर्वी शिवसेनेने सातारा मतदारसंघ रिपाइंला सोडल्याचे जाहीर केल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. विशेष म्हणजे साताऱ्यातील रिपाइंचा उमेदवारही शिवसेनाच ठरविणार आहे. त्यासाठी सोमवारी उद्धव ठाकरे व रामदास आठवले यांच्यात चर्चा होणार आहे, असे समजते. शिवसेनेने कल्याण व रामटेकमधून आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे रिपाइंला या मतदारसंघांबाबत चर्चेची दारेही बंद झाली आहेत. गोरेगाव येथे शनिवारी झालेल्या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात महादेव जानकर यांना माढाऐवजी बारामती मतदारसंघ देण्याचे जाहीर करताच, ‘माढा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा,’ अशा घोषणा देत त्यांच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या नेत्यांविरोधातील आपला रोष प्रकट केला.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Mar 2014 रोजी प्रकाशित
महायुतीत असंतोष!
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीविरुद्ध महायुतीच्या महाएल्गार सभांचा धडाका सुरू असतानाच, लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून मात्र घटक पक्षांमध्ये असंतोष भडकू लागला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 03-03-2014 at 03:46 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clash in mahayuti