प्रचाराच्या रणधुमाळीत सातत्याने त्याच-त्याच आरोप प्रत्यारोपांचे दळण दळले जात असताना केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी नव्या आरोपांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी नरेंद्र मोदी आणि त्यांचे निकटवर्तीय अमित शहा यांच्या विरोधात त्यांना अटक करण्याइतपत पुरावे आहेत, मात्र त्यांना वाचविण्याचा कोणी तरी प्रयत्न करीत आहे, असा आरोप सिब्बल यांनी केला.
गुजरातमध्ये येत्या ३० तारखेला मतदान होणार आहे. एकाच टप्प्यात होणाऱ्या या मतदानासाठीच्या प्रचाराचा सोमवारी अखेरचा दिवस होता. या पाश्र्वभूमीवर कपिल सिब्बल यांनी मोदी आणि भाजप यांच्यावर कठोर शब्दांत शरसंधान केले.
‘एक वकील म्हणून माझ्यासह अनेकांना इशरत जहाँप्रकरणी मोदी आणि शहा यांना तुरुंगात डांबण्यायोग्य भक्कम पुरावे दिसत आहेत. मात्र, असे असताना त्या दोघांवरही कारवाई झालेली नाही. यामागे नेमके सूत्रधार कोण हे तपासणे गरजेचे आहे’, असे सिब्बल म्हणाले. गुजरातचे मॉडेल हे विकासाचे मॉडेल नसून ते ‘एन्काऊंटर मॉडेल’ आहे, अशी टीकाही त्यांनी मोदींवर केली.
केंद्रात काँग्रेसचीच सत्ता असूनही मोदी आणि शहा यांच्यावर कारवाई होऊ शकली नाही, हे केंद्र सरकारचेच अपयश नव्हे का, या प्रश्नास सिब्बल यांनी नकारात्मक उत्तर दिले. तसेच १६ मे पूर्वी पाळत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमू, असे  ते म्हणाले.

हाच तो पुरावा..
इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी तुमच्याकडे असलेल्या भक्कम पुरावा कोणता, या पत्रकारांच्या प्रश्नास उत्तर देताना सिब्बल यांनी एका दूरध्वनी संभाषणाचा संदर्भ दिला. बनावट चकमक प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले पोलीस अधिकारी वंजारा आणि तत्कालीन गृह राज्यमंत्री अमित शहा यांच्यात १५ जून २००४ रोजी म्हणजेच चकमकीच्या आदल्या दिवशी आणि चकमकीवेळी झालेल्या संभाषणाचे ध्वनिमुद्रण मोदी आणि शहा यांना अटक करण्यासाठी पुरेसे आहे, असे सिब्बल म्हणाले. तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेले जबाबही शहा आणि मोदी यांच्या संशयास्पद भूमिकेकडेच अंगुलीनिर्देश करतात, जो फौजदारी दंड संहिता १६४ प्रमाणे गुन्हा ठरतो, असेही सिब्बल म्हणाले.

Story img Loader