अपवाद वगळता काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघात या वेळी गेल्या वेळचे शत्रू काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे मुकुल वासनिक आणि महायुतीचे कृपाल तुमाने यांच्यातच खरी लढाई असली तरी बसपचा उमेदवार किती मते घेतो, यावरही विजयाचे गणित ठरले आहे. गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामावर मते देण्याचे आवाहन वासनिक मतदारांना करीत आहेत. त्यांच्या या आवाहनाला मतदार किती प्रतिसाद देतात, तसेच काँग्रेसचेच कार्यकर्ते त्यांचे किती काम करतात, यावरही त्यांचे भवितव्य ठरले आहे.
गेल्या वेळी बसपचे उमेदवार प्रकाश टेंभुर्णे यांनी ६२ हजार मते घेतली होती. ते आता काँग्रेसवासी झाले आहेत. बसपने या वेळी किरण पाटणकर यांना उमेदवारी दिली आहे. त्या सध्या नागपुरातील इंदोरा भागातील नगरसेविका असून कव्वाल म्हणून प्रसिद्ध आहे. बसपची मते आणि स्वत:ची वैयक्तिक मते, यावर विजयी होऊ, असा पाटणकरांचा विश्वास आहे. गेल्या पाच वर्षांत वासनिकांनी उल्लेखनीय कामे केली नाहीत, असा त्यांच्यावर आरोप होत आहे. त्यातच त्यांनी खऱ्या काँग्रेसींना डावलून अविश्वासू शिलेदारांवर विश्वास ठेवला. त्यामुळे काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली तर आश्चर्य वाटायला नको, तसेच राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते त्यांचा मनापासून किती प्रचार करतील, याचीही शंकाच आहे. गेल्या वेळी त्यांचा विजय फक्त १७ हजार मतांनी झाला होता. या वेळी तशी परिस्थिती नाही. शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने यांचा पराभव झाला असला तरी ते गेली पाच वर्षे मतदारांच्या संपर्कात होते. त्यांना गेल्या निवडणुकीत रामटेक आणि हिंगणा मतदारसंघात फटका बसला होता. हिंगणा मतदारसंघातून त्यांना वासनिकांपेक्षा १५ हजार मते कमी मिळाली होती. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर लगेच सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा हिंगण्यात भाजपचे विजय घोडमारे यांनी राष्ट्रवादीचे रमेश बंग यांचा पराभव केला.
काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघात नेहमीच काँग्रेसच्या उमेदवाराला कमी मते मिळाली आहेत. सावनेर-कळमेश्वर आणि कामठी-मौदा मतदारसंघात जवळपास तुमाने आणि वासनिक यांच्यात अल्प मतांचा फरक सोडला तर समान मते मिळतील, असा अंदाज आहे. उमरेडमध्ये भाजपचे वर्चस्व आहेच. या मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य घेणे आवश्यक आहे. येथील नकारात्मक मते बदलवण्यासाठी तुमाने यांना परिश्रम घ्यावे लागणार आहेत. या वेळी बरिएमच्या सुलेखा कुंभारे रिंगणात नसून त्यांनी वासनिकांना पाठिंबा दर्शवला आहे. गेल्या वेळी त्यांनी ४० हजार मते घेतली होती. याशिवाय, भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर लोकसभेच्या निवडणुका लढत असलेल्या ‘आप’ने रामटेक मतदारसंघातून प्रताप गोस्वामी यांना उमेदवारी दिली आहे.
मोदी लाटेचा फक्त आभास -मुकुल वासनिक
यूपीए सरकारने गेल्या दहा वर्षांत गोरगरीब व समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजना राबवल्या. त्या माध्यमातून देशाचा विकास झाला आहे, तसेच शेतकऱ्यांसाठी पॅकेजची घोषणा करून त्यांना मदत केली. केंद्र व राज्य सरकारने केलेल्या कामांचे मुद्दे घेऊन लोकांपुढे जाऊ. लोकांची त्याला साथ मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार मुकुल वासनिक यांनी व्यक्त केला. देशात नरेंद्र मोदींची लाट नाही. तसा फक्त आभास निर्माण करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
विजय निश्चित- कृपाल तुमाने
या मतदारसंघात ९० टक्के शेतकरी आहेत. काँग्रेसने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. मिहान, एसईझेडमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, पण त्यांना योग्य मोबदला मिळाला नाही. नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्याची मदत अजूनही पोहोचलेली नाही. त्यामुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचा काँग्रेसवर विश्वास उरला नाही. त्यामुळे जिल्ह्य़ातील शेतकरी माझ्या पाठीशी आहे. विद्यमान खासदार फक्त भूमिपूजनच करीत आहेत. गेल्या पाच वर्षांत त्यांनी कुठलीही विकासकामे केली नसल्याने मतदार त्यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे, असा विश्वास शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने यांनी व्यक्त केला.