यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्वत: लढण्यास असमर्थता व्यक्त करीत आपल्या मुलासाठी आग्रह धरला असतानाच निवडून येण्याचा निकष या मुद्दयावर सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांना शुक्रवारी उमेदवारी जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री – प्रदेशाध्यक्ष वादात मुख्यमंत्र्यांनी प्रदेशाध्यक्षांवर कुरघोडी केल्याचे मानले जाते.
विदर्भातील दहा मतदारसंघांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्यापर्यंत मुदत आहे. आदल्या दिवसापर्यंत झालेल्या घोळात शेवटी रात्री मोघे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्वत:च लढावे, असा प्रस्ताव मांडण्यात आला. पण राज्यात लक्ष घालता येणार नाही म्हणून लढण्यास त्यांनी असमर्थतता व्यक्त केली. जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्ष असलेल्या मुलाला उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी केली होती. माणिकरावांचा मुलगा निवडून येण्याबाबत स्थानिक पातळीवरील नेत्यांनी साशंकता व्यक्त केली होती. निवडून येण्याची क्षमता हा निकष मुख्यमंत्र्यांनी लावून धरला.
मुख्यमंत्री चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांच्यात गेली सहा महिने बेबनाव सुरू आहे. संधी येताच मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतील आपले वजन वापरून माणिकरावांवर कुरघोडी केली. प्रदेशाध्यक्षांच्या मुलामध्ये निवडून येण्याची क्षमता नाही हा युक्तिवाद दिल्लीत मान्य झाला. माणिकरावांना हा पक्षांतर्गत धक्का असल्याचे मानले जाते.
सामाजिक न्यायमंत्री मोघे हे काँग्रेसचे सर्वात ज्येष्ठ मंत्री आहेत. २००४चा अपवाद वगळता १९८० पासून ते सातत्याने विधानसभेवर निवडून आले आहेत.
..आणि माणिकरावांचे गणित चुकले !
मतदान पद्धतीने उमेदवार निवडण्याच्या राहुल गांधी यांच्या प्रयोगानुसार राज्यात यवतमाळ आणि औरंगाबाद या दोन मतदारसंघांची सुरुवातीला निवड करण्यात आली होती. यवतमाळमध्ये मतदान पद्धतीने उमेदवार ठरविण्यात आला असता तर माणिकरावांचे पुत्र राहुल सहजपणे निवडून आले असते. कारण प्रदेशाध्यक्ष या नात्याने जिल्हा काँग्रेसवर त्यांची चांगली पकड आहे. माणिकरावांनी मुलासाठीच यवतमाळची निवड केल्याचा आक्षेप घेण्यात आल्यावर वर्धा आणि लातूर या दोन मतदारसंघांची निवड करण्यात आली. तक्रारीमुळेच यवतमाळ मतदारसंघ बदलण्यात आला आणि माणिकरावांचे सारेच गणित चुकले.

Story img Loader