उत्तर मध्य- मुंबई मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवार प्रिया दत्त यांच्या विरोधात असलेली गटबाजी किंवा नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी पुढाकार घेतला. मुंबईत गतवेळप्रमाणेच यश मिळविण्याचा निर्धार पक्षाने केला आहे.
उत्तर मध्य- मुंबई मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांच्या विरोधात नसिम खान आणि कृपाशंकर सिंग सक्रिय झाले नव्हते. या दोन्ही नेत्यांनी प्रिया दत्त आम्हाला विश्वाासात घेत नाहीत, अशी तक्रार केली होती. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्वच नेते उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर सर्व नेत्यांनी पक्षाच्या उमेदवारांसाठी काम करण्याचा निर्धार केला. कृपाशंकर सिंग आणि नसिम खान यांच्याबद्दल नाहक वावडय़ा उठविण्यात येत होत्या. वास्तविक परिस्थिती तशी नव्हती, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर यांनी सांगितले. २० तारखेला एमएमआरडीए मैदानावर होणारी सोनिया गांधी यांची जाहीर सभा यशस्वी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.