राजकारणात काही बाबी अशा घडतात की, तो योगायोग असतो की ठरवून केले जाते याचा अर्थ सर्वसामान्यांना समजत नाही. काही गोष्टी मात्र योगायोगाने खरोखरीच घडून जातात. भाजपचा बहुचर्चित जाहीरनामा सोमवारी सकाळी प्रसिद्ध करण्यात आला. लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी यांच्यापासून पहिल्या फळीतील सारे नेते उपस्थित होते. भाजपच्या जाहीरनाम्याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना देण्यात आला. राष्ट्रवादीने गाजावाजा न करता हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. एरवी गल्लीतील नेत्याच्या पक्षप्रवेशापासून कोणत्याही मोठय़ा घोषणेसाठी राष्ट्रवादीकडून वातावरणनिर्मिती केली जाते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि राष्ट्रवादीचे पडद्याआडून साटेलोटे असल्याचा आरोप काँग्रेसच्या गोटातून करण्यात येतो. देशात भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, असे विधान गेल्याच आठवडय़ात करून शरद पवार यांनी खळबळ उडवून दिली. तत्पूर्वी, पवार यांनी मोदी यांच्याबाबत अनुकूल भूमिका घेतली होती. पुढे पवार यांच्यावर टीका सुरू होताच त्यांनी मोदी यांच्यावर तोफ डागली. नंदुरबार, भिवंडी, सांगली या मतदारसंघांमध्ये भाजपला उमेदवारांची रसद  राष्ट्रवादीकडूनच पुरविण्यात आली. कारण या तिन्ही मतदारसंघांतील भाजपचे उमेदवार हे निवडणुकीच्या तोंडावर भाजपवासी झाले. विदर्भात चार जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादीचा भाजपशी दोस्ताना आहे. अजूनही काही मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकवाक्यता झालेली नाही. राष्ट्रवादीचे नेतृत्व आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातून विस्तवही जात नसला तरी नितीन गडकरी यांचे पवार यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. यातूनच गडकरी यांच्या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पवार यांनी राजकारणात कोणीच कायमचे अस्पृश्य नसते, अशी भूमिका मांडली होती. पवार यांच्या भाजप-अनुकूल अशा विविध विधानांमुळे काँग्रेसचे नेते संभ्रमात पडतात. पवार यांच्या भूमिकेबद्दल काँग्रेसजनांच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. ही पाश्र्वभूमी असतानाच भाजप आणि राष्ट्रवादीचा जाहीरनामा एकाच दिवशी प्रसिद्ध झाल्याने चर्चा तर सुरू झालीच. हा निव्वळ योगायोग होता, असा खुलासा राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याला म्हणूनच करावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा