केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीतील खर्चाला चाप लावण्याचा प्रयत्न केला असला तरी, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांमध्ये प्रचारावर केलेल्या खर्चातही चुरस असल्याचे दिसले. निवडणूक आयोगाकडून अद्याप खर्चाचा संपूर्ण तपशील जाहीर करण्यात आलेला नाही.
नंदूरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे माणिकराव गावित यांनी २२ एप्रिलपर्यंत ४० लाख १५ हजार ९२१ रुपये खर्च केल्याचे दाखविले आहे. तर त्यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी भाजपच्या डॉ. हिना गावित यांचा खर्चा २९ लाख ६३ हजार ६३१ रुपये झाला आहे. रावेर मदारसंघातील भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी १७ एप्रिलपर्यंत २२ लाख ११ हजार २३९ रुपये खर्च केल्याचे दाखविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मनिष जैन यांनी १४ लाख ९६ हजार ४४९ रुपये खर्च केल्याची माहिती दिली आहे.
नागपूर मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी व काँग्रेसचे विलास मुत्तेमवार यांची निवडणूक खर्चाची माहिती अद्याप उपलब्ध करून देण्यात आली नाही. नांदेडमधील काँग्रेसचे अशोक चव्हाण यांच्याही खर्चाची माहिती उपलब्ध नाही. अमरावतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनीत राणा यांनी ७ एप्रिलपर्यंत २६ लाख २५ हजार ३४९ रुपये खर्च झाल्याचे निवडणूक आयोगाला कळविले आहे.
बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी ८ एप्रिलपर्यंत २६ लाख १ हजार ९५९ रुपये खर्च केल्याचे दाखविले आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे महादेव जानकर यांनी २९ लाख २१ हजार ५०० रुपये खर्च करुन प्रचारालरील खर्चाच तरी आघाडी घेतली आहे.
शिरोळेंची आघाडी
पुणे मतदारसंघात काँग्रेसचे विश्वजित कदम यांनी १५ एप्रिल पर्यंत २५ लाख ६६ हजार २०२रुपये खर्च केले आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे अनिल शिरोळे यांनी २७ लाखाच्या वर खर्च करून आघाडी घेतली आहे. सर्व मतदारसंघातील खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेला नाही.
निवडणूक खर्चातही आघाडी,महायुतीत चुरस
केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीतील खर्चाला चाप लावण्याचा प्रयत्न केला असला तरी, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांमध्ये प्रचारावर केलेल्या खर्चातही चुरस असल्याचे दिसले.
First published on: 26-04-2014 at 03:16 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Competition in poll expenses in congress ncp alliance and mahayuti