मनसेचा प्रचाराचा सारा भार हा राज ठाकरे यांच्यावर असून राज यांची घणाघाती भाषणे हेच मनसेचे युएसपी असताना मुंबई, ठाणे, नाशिकमधील सभेत त्यांनी केलेल्या ‘थंड’ भाषणामुळे मनसेमध्येच अस्वस्थता निर्माण झाली आहे. हवे तेवढे मुद्दे असताना काही ठिकाणी ‘काय तेच तेच बोलायचे’ अशी सुरुवात करून एखाद दुसरा टोला हाणून भाषण संपवित असल्यामुळे मनसेचे उमेदवारही हवालदिल झालेले आहेत. तथापि प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे उद्यापासून राज यांच्या तोफा धडाडतील असा विश्वास एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने व्यक्त केला.
एकीकडे विदर्भासह राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या तडाखेबंद सभा होत असताना मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिलेल्या राज यांच्या भाषणांकडेही साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. पुणे व डोिबवली येथील सभेत शिवसेनेवर तोफ डागताना बाळासाहेबांना देण्यात आलेले तेलकट वडे व सूप काढत उद्धव यांचा जोरदार समाचार राज यांनी घेतला खरा परंतु मनसेचा ठोस कार्यक्रम सांगण्यात आणि काँग्रेस-राष्ट्रवादीवरही हल्ला चढवण्याची अपेक्षा पूर्ण झालेली नाही. त्यानंतर नवी मुंबई, घोटी, नाशिक, गिरगावमधील सभेतही ‘राज राग’ बाहेर न आल्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाल्याचे दिसून येत आहे.
लोकसभेत मनसेला मिळणारी मते व जागांच्या निकालावर विधानसभेचेभवितव्य अवलंबून असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत मोदी लाटेतही राज यांचा करिष्मा आणि तरुणाईला असलेले आकर्षण टिकून असताना राज ठाकरे का थंडावले आहेत, हे कोडे कार्यकर्त्यांना पडले आहे.

Story img Loader