लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने (राजद) त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. गुजरातमध्ये २००२ च्या दंगलींच्या वेळी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर जळजळीत टीका केल्याचे विस्मरण पासवान यांना झाले आहे, असेही काँग्रेस आणि राजदने म्हटले आहे.
पासवान यांच्या भूमिकेमुळे त्यांचा संधिसाधू चेहरा उघड झाला आहे, कुटुंबीयांच्या हितासाठी त्यांनी आपल्या तत्त्वांना तिलांजली दिली आहे, असे बिहार काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चौधरी यांनी म्हटले आहे. पासवान यांनी केवळ विश्वासार्हताच गमावली नाही तर तत्त्वापेक्षाही आपल्याला कुटुंबीयांचे हितच महत्त्वाचे असल्याचे सिद्ध केले आहे, असेही चौधरी म्हणाले.
गोध्रातील दंगलींनंतर पासवान यांनी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारशी फारकत घेतली आणि त्यानंतर ते सातत्याने नरेंद्र मोदी जातीयवादी असल्याची टीका करीत होते. मात्र आता त्यांनी मोदी आणि भाजपशीच हातमिळवणी केली आहे, असेही ते म्हणाले.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि भाजपने पासवान यांची जात महादलित यादीतून वगळली त्यांच्याशीच पासवान यांनी हातमिळवणी कशी केली, याचे स्पष्टीकरण जनतेला द्यावेच लागेल, असे राजदचे सरचिटणीस रामकृपाल यादव यांनी म्हटले आहे.

Story img Loader