राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान विरोधकांना चिमटे काढण्याची एकही संधी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने सोडली नाही. चर्चेला सुरुवात करताना राजीव प्रताप रुडी यांनी राष्ट्रपतींच्या भाषणातून देशाच्या विकासाचा राजमार्ग सांगितल्याची भावना व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोंड भरून स्तुती करताना रुडी यांनी काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह आम आदमी पक्षाला शेलक्या शब्दांत टोमणे लगावले. गेल्या ६५ वर्षांत काँग्रेसच्या बजबजपुरीला कंटाळलेल्या भारतीय मतदारांनी त्यांची अवस्था एखाद्या प्रादेशिक पक्षासारखी करून टाकली, असा टोमणा रुडी यांनी लगावला. आर्थिक गैरव्यवहाराची शिक्षा मतदारांनी काँग्रेसला दिली, असे ते म्हणाले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील एकेका मुद्दय़ावर रुडी यांनी विस्ताराने भाष्य केले. आतापर्यंत नोकरशहा कायदे बनवत होते. आमचे (खासदारांचे) काम जणू काही सही करण्यापुरतेच उरले होते. आता आम्ही नियम बनवू व ते (अधिकारी) लागू करतील, अशा शब्दात रुडी यांनी केंद्र सरकारच्या कार्य संचालनाचे तंत्र अप्रत्यक्षपणे सांगून टाकले. देशातील बेरोजगारांच्या समस्येवर केंद्र सरकार गंभीर असल्याचा दावा त्यांनी केला. सर्वाधिक रोजगार पर्यटन विकासातून होऊ शकतो, पण भारताने या क्षेत्राकडे दुर्लक्ष केले, असा आरोप त्यांनी केला. देशातील शिक्षण व्यवस्थेचे वाभाडे काढताना, देशात ६६० विद्यापीठे आहेत. त्यापैकी एकही विद्यापीठ जागतिक यादीत पहिल्या दहामध्ये नाही. ही अनास्था दूर करणे सरकारची जबाबदारी असल्याचे रुडी म्हणाले. अधून-मधून रुडी तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांना चिमटे काढत होते. तृणमूलचे कल्याण बॅनर्जी सातत्याने रुडींच्या भाषणात व्यत्यय आणत होते. तेव्हा रुडी यांनी आवर्जून रेल्वे मंत्रालयाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, प्रादेशिक पक्षांनी रल्वे मंत्रालयाचे पार वाटोळे करून टाकले. तिकीट भाडेवाढीवरून तृणमूलने तत्कालीन रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांची हकालपट्टी केली होती, त्याचाही अप्रत्यक्ष संदर्भ देत रुडी यांनी तृणमूलवर टीका केली.
लोकजनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा व केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी राजकीय पक्षांकडे नेता व नीती असली, तरी नियत चांगली नसल्याने देशाचा विकास झाला नसल्याची खंत व्यक्त केली. पदोन्नतीत आरक्षणाच्या रखडलेल्या प्रस्तावासाठी त्यांनी सर्वच राजकीय पक्षांना जबाबदार धरले.
सभागृहात ‘महाभारत’
सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांचे जोरदार खंडन काँग्रेसचे सभागृह नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केले. ते म्हणाले की, भाजप निव्वळ प्रसिद्धीतंत्राच्या जोरावर सत्तेत आला. असे असले तरी भाजपला मिळालेल्या मतांच्या एकूण टक्क्य़ापेक्षा काँग्रेसला किती तरी जास्त मते मिळाली आहेत. पीएसयू, माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार क्षेत्रातील क्रांती काँग्रेसमुळे आल्याचा दावा त्यांनी केला. कौरवांची (भाजप) संख्या कितीही वाढली तरी पांडवांची (काँग्रेसची) शक्ती जास्त असते, असे उदाहरण देताच सभागृहात हशा पिकला.
हशा, टाळ्या नि चिमटे..
भाजप नेते राजीव प्रताप रूडी यांच्या भाषणात तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांच्यासह विरोधी पक्षांचे सदस्य सातत्याने अडथळा आणत होते. बिहारच्या एका नेत्याने बायकोला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. स्वत:ची राजकीय कारकीर्द संकटात असताना असे प्रयोग त्यांनी केले, असा टोला रूडी यांनी लालूप्रसाद यांचे नांव न घेता हाणला. त्यावर राजदच्या पप्पू यादव यांनी आक्षेप घेतला. ते थेट लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीकडे येण्याचा प्रयत्न करू लागले. जगदंबिका पाल यांनी यादव यांची समजूत काढली. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी याची दखल घेतली. त्या म्हणाल्या की, ज्येष्ठ सदस्य असे करत असतील तर ३१५ नवीन सदस्य हीच परंपरा पुढे चालवतील. त्यानंतर रामविलास पासवान यांनी हजरजबाबीपणे, ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षांत शिकणाऱ्याला महाविद्यालय स्वत:च्या मालकीचे असल्यासारखे वाटते, असाच हा प्रकार आहे, अशा टोमणा पप्पू यादव यांना लगावला.
शिवसेनेच्या भगव्यामुळे लोकसभेत गदारोळ!
शिवसेना खासदार प्रताप जाधव यांच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवल्याच्या वक्तव्यावरून लोकसभेत गदारोळ झाला. जाधव यांचे वक्तव्य भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान करणारे असल्याचा आक्षेप विरोधी पक्षांनी घेतला. बाळासाहेब ठाकरे यांनी लाल किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवण्याचे स्वप्न पाहिले होते. ते आज पूर्ण झाले, असे जाधव म्हणाले होते. तिरंग्यात सर्वात वर भगवा रंग आहे, याकडे जाधव यांनी लक्ष वेधले. त्यावर काँग्रेस व तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. खरगे म्हणाले की, लाल किल्ल्यावर केवळ तिरंगा ध्वज फडकवला जातो. जाधव यांच्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान झाला आहे. त्यांचे वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्यात यावे. पीठासीन अधिकारी प्रल्हाद जोशी यांनी त्यास नकार दिल्यावर गोंधळ वाढला. अखेरीस १५ मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले. जाधव यांच्या वक्तव्याची शहानिशा केल्यानंतरच निर्णय होईल, असे आश्वासन अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी दिल्यानंतर यावर पडदा पडला.