लोकसभा निवडणुकीत एकीकडे भाजपाचे पंतप्रधानपदाचे दावेदार नरेंद्र मोदी यांनी आक्रमक प्रचाराच्या माध्यमातून झोप उडविलेली असताना दुसरीकडे पक्षांतर्गत कुरबुरी वाढल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आपापसातील मतभेद तूर्तास बाजूला ठेवून आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करा अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी असुंतष्टांना दिला.
निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, बुलढाणा, अमरावती आदी मतदारसंघात दोन्ही काँग्रेसमधील संघर्ष उफाळून आला आहे. ठाणे आणि कल्याणमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यास काँग्रेसच्या काही नेत्यांनी नकार दिला आहे. एवढेच नव्हे तर नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर, कल्याण आदी ठिकाणी काँग्रेस प्रचारासापासून अलिप्त राहिल्याचे चित्र दिसत आहे. तर भिवंडी आणि पालघरमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारापासून राष्ट्रवादी दूर राहिली आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्गमध्येही राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी निलेश राणे यांचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. तर अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर यांनी राष्ट्रवादीच्या नवनीत कौर राणा यांचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. या पाश्र्वभूमीवर दोन्ही पक्षातील वादावर तोडगा काढण्यासाठी आघाडीच्या समन्वय समितीच्या नेत्यांची आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठक झाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, उद्योगमंत्री नारायण राणे तसेच प्रत्येक मतदार संघातील शहराध्यक्ष आणि उमेदवार आदी यावेळी उपस्थित होते. ही निवडणूक आघाडी एकत्रितपणे लढवित असून दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांमध्ये काही वाद, तक्रारी असतील तर त्या बाजूला ठेवा, आपल्या तक्रारी पक्षाच्या नेत्यांकडे मांडा. मात्र निवडणुकीत त्याचा परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या अशी सूचना यावेळी समन्वय समितीच्या नेत्यांनी केली. एवढेच नव्हे तर यापुढे आघाडीच्या उमेदवाराचे काम न करणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आल्याचे समजते. तत्पूर्वी समन्वय समितीच्या नेत्यांची बैठक झाली त्यात पुण्यातील बैठकीनंतरही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेस उमदेवाराचे काम करत नसल्याची तक्रार राणे यांनी केली.

अंतुलेंची नाराजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दूर
पनवेल : राजकारणात कधीही काहीही घडू शकते, याचा प्रत्यय रायगडच्या अंतुले आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीनंतर आला आहे. भाजपपेक्षा काँग्रेसमध्येच ज्येष्ठांची अवस्था बिकट झाल्याची झोड उठवत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि रायगडचे जेष्ठ नेते बॅ. ए. आर. अंतुले यांनी दोन आठवडय़ांपूर्वी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र मुख्यमंत्री चव्हाण यांनी अंतुलेंच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढल्यानंतर, त्यांची नाराजी दूर झाली व त्यांनी शेकापला दिलेला पाठिंबा मागे घेतला. आयते कोलित विरोधकांच्या हाती मिळू नये म्हणून मुख्यमंत्री चव्हाण यांनी अंतुलेंच्या घरी जात त्यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा केली.

Story img Loader