आंध्र प्रदेश पुर्नरचना विधेयकासाठी अवघ्या काही तासांसाठी का होईना काँग्रेस व भाजपमध्ये लोकसभेत युती झाली होती. त्यावर उभय पक्षांवर शरसंधान करीत तृणमूल काँग्रेसचे सदस्य कल्याण बॅनर्जी यांनी कहर केला. उपहासात्मक घोषणा देत बॅनर्जी यांनी काँग्रेस व भाजपला एकत्र तर आणलेच; शिवाय नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांचीदेखील युती करून टाकली ! त्यांच्या घोषणाबाजीमुळे तणावात सुरु असलेल्या चर्चेत हास्याची लकेर उमटली. ती घोषणा ‘राहुल-मोदी जोडा (जोडी) है; आज का दिन काला है!’ अर्थात विधेयकावर चर्चा सुरु असताना पहिलांदाच चित्रवाणी प्रक्षेपण बंद ठेवण्यात आले होते.
भाजपच्या विनशर्त पाठिंब्यामुळे तेलंगणानिर्मितीचा मार्ग प्रशस्त झाला. त्यामुळे भाजप-काँग्रेसचा जोडा असल्याची टीका कल्याण बॅनर्जी यांनी केली.  मागील आठवडय़ात झालेल्या ‘मिरपूड’ प्रकरणामुळे आज, मंगळवारी आंध्र प्रदेश पुर्नरचना विधेयक मांडताना सत्ताधारी काँग्रेसने पुरेपूर ‘काळजी’ घेतली होती. केंद्रीय सचिवालय मेट्रो स्टेशनवरून संसदेकडे पायी जाणाऱ्या प्रवाशांना अधिकृत ओळखपत्र दाखविल्यानंतरच प्रवेश देण्यात येत होता. दुपारी तीन वाजेपर्यंत सलग तिसऱ्यांदा कामकाज तहकूब झाल्यानंतर आंध्र प्रदेश पुर्नरचना विधेयक मांडण्यात येणार नसल्याची ‘चर्चा’ काँग्रेस नेते करीत होते. दुपारनंतर लोकसभेचे थेट प्रक्षेपण बंद ठेवण्यात आले होते.सोनिया गांधी सभागृहात आल्यावर तेलंगणाची आज निर्मिती होणार, हे स्पष्ट झाले होते. विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांचे सभागृहात आगमन होत असताना तेलंगणा समर्थक खासदार व ‘तेजस्विनी’ फेम विजयाशांती यांनी त्यांना थेट मिठीच मारली. त्यावरून भाजपच्या भूमिकेचा अंदाज एव्हाना सभागृहाला आला होता.  केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सभोवती काँग्रेस सदस्यांनी ‘सुरक्षा’ कडे उभारत होते. त्यावर ‘गृहमंत्र्यांनाच सुरक्षा द्यावी लागली तर देशाचे काय?, असा सवाल हैदराबादचे खासदार असादुद्दीन ओवैसी यांनी विचारताच हशा पिकला.  
शिंदे यांचे बोलणे संपताच स्वराज यांनी बोलण्यास सुरुवात केली. भाषणाच्या शेवटी त्या म्हणाल्या की, ‘तेलंगणासमर्थकांनी काँग्रेसलाच याचे श्रेय देवू नका. नाहीतर बाहेर जावून सोनिया अम्मांचा जयजयकार कराल. पण सोनिया अम्मांची आठवण काढताना चेन्नम्मा, अर्थात मला विसरू नका.’ स्वराज यांच्या वक्तव्याला भाजप सदस्यांनी बाके वाजवून दिलखुलास दाद दिली.
भाजपचा सहकारी पक्ष शिवसेनचा तेलंगणा निर्मिताला प्रारंभापासूनच विरोध आहे.  सेनेचे सभागृह नेते अनंत गीते नेटाने तेलंगणाविरोधकांच्या सूरात सूर मिसळत होते.  राज्यसभा सदस्य संजय राऊत व अनिल देसाई प्रेक्षक गॅलरीतून या ऐतिहासिक विधेयकावरील चर्चा पाहत होते. तेलंगणाविरोधकांच्या घोषणेत अधून-मधून ‘प्रमोशन में आरक्षण’ अशी घोषणाही एकू येत होती.

भाजपचा सरकारला टोला
नवी दिल्ली :  आंध्र प्रदेश विभाजनाच्या विधेयकासाठी सरकारला पाठिंबा देतानाच तेलंगण निर्मितीचे श्रेय स्वत:कडे घेण्याचा प्रयत्नही भाजपने मंगळवारी केला.   लालकृष्ण अडवाणी व पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी तेलंगण निर्मितीचे आश्वासन दिले होते, असे सांगतानाच विधेयक मांडण्यास सरकारने जाणीवपूर्वक विलंब केल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केला. २००४ मध्ये तेलंगणनिर्मितीचे आश्वासन दिल्यानंतर बरोबर १४ वर्षांनी हे विधेयक मांडण्यात आले.  स्वपक्षीय खासदार, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आपल्याच सरकारविरोधात लोकसभेत निदर्शने करीत असल्याचा हा ऐतिहासिक प्रसंग आहे, असे त्या म्हणाल्या. त्यांची समज काढल्यानंतर हे विधेयक सादर केले असते तर बरे झाले असते, असा टोला स्वराज यांनी काँग्रेसला लगावला.

Story img Loader