उत्तर गोव्यात भाजपने यंदाही श्रीपाद नाईक यांनाच उमेदवारी दिली असून काँग्रेसने रवी नाईक यांना त्यांच्याविरोधात उतरविले आहे. आम आदमी पार्टीने दत्ताराम नाईक, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सुहास नाईक यांना उमेदवारी दिली आहे. गोवा लोकशाही मंचातर्फे दयानंद नार्वेकर हे लोकांकडे कौल मागत आहेत. दक्षिण गोव्यातून काँग्रेसने फ्रान्सिस सार्दिन यांच्याऐवजी आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना तिकीट दिले असून भाजपने नरेंद्र सावईकर यांना रिंगणात उतरविले आहे. आम आदमी पार्टीच्या वतीने स्वाती केरकर रिंगणात आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे राजू मंगेशकर हे निवडणूक लढवीत आहेत. विधानसभेत भाजपचे २१ आमदार असून त्याखालोखाल काँग्रेसचे संख्याबळ नऊ, गोवा विकास पार्टीचे दोन, मगोपचे तीन व पाच अपक्ष आमदार आहेत. या पाश्र्वभूमीवर भाजप आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष मतदारांकडे कौल मागत आहेत.
याचे मुख्य कारण म्हणजे खाण उद्योग बंद पडल्यामुळे शेकडो कामगार बेकारीच्या खाईत लोटले गेले असून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मोठा आहे आणि नेमकी हीच बाब सत्ताधाऱ्यांना अडचणीची ठरू शकते. खाणी बंद पडण्यास कोण जबाबदार आहे, या मुद्दय़ावरून मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची वक्तव्ये नेहमीच संदिग्ध राहिली असल्याचा आरोप विरोधक करतात. राज्याला विशेष दर्जा देण्याचा मुद्दाही कायम ‘इश्यू’ ठरला आहे. याशिवाय विद्यमान दाभोळी विमानतळ बंद करून तो मोपा येथे हलविण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. हे विषय तसे राष्ट्रीय स्तरावरील असले तरी त्यास स्थानिक राजकारणाचाही पदर असल्यामुळे भाजपसाठी काहीसे त्रासदायक ठरण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसच्या तंबूतही फारसे आशादायक चित्र नाही. रवी नाईक आणि त्यांच्या चिरंजीवांचा अमली पदार्थाच्या व्यवहारात हात असल्याचा मुद्दा ऐन निवडणुकीच्या तोंडावर ऐरणीवर आला आहे, तर गोव्याच्या किनारपट्टीवरील भाजपच्या आमदारांचेही हात अमली पदार्थाच्या व्यवहाराने बरबटलेले असल्याचा आरोप करून काँग्रेसने तसेच प्रत्युत्तर दिले आहे. दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचे चिरंजीव शालोम सार्दिन यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला असून चर्चिल आलेमाव यांनी तृणमूल काँग्रेसच्या वतीने दक्षिण गोव्यातूनच अर्ज भरल्यामुळे आलेक्स लॉरेन्स यांच्यासमोरील आव्हाने वाढली आहेत. विशेष म्हणजे आलेमाव यांची कन्या वालंका आलेमाव या गोवा युवा काँग्रेसच्या अजूनही नेत्या आहेत. मात्र काँग्रेसच्या प्रचारात त्यांचा तसा सक्रिय सहभाग दिसत नाही. गोवा विकास पार्टीचे सर्वेसर्वा मिकी पाशेको यांनी ‘काँग्रेसला धडा शिकविण्यासाठी आपण भाजपला पाठबळ’ देत असल्याचे जाहीर केले.  गेल्या पाच वर्षांत राष्ट्रीय स्तरावरील प्रचंड भ्रष्टाचारामुळे काँग्रेसवर जनतेची नाराजी असली तरी गोव्यातही गेली दोन वर्षे भाजप सत्तेवर असल्यामुळे अशा संमिश्र वातावरणात गोव्यातील मतदार येत्या १२ एप्रिल रोजी कोणाला आपला कौल देतील, याचे औत्सुक्य सर्वानाच आहे.

ख्रिस्ती मतांचे विभाजन?
काँग्रेसचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी फ्रान्सिस सार्दिन व वालंका आलेमाव यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्याची जाहीर मागणी केली आहे. याखेरीज गोवा विकास पार्टीने आता भाजपच्या पारडय़ात आपले बळ टाकले असून त्यामुळे दक्षिण गोव्यातील ख्रिस्ती बांधवांच्या मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बरोबर दोन वर्षांपूर्वी राज्यात सत्तारूढ झालेला भाजप आता मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकण्याच्या ईषेने उतरला आहे. पर्रिकर सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यांतच राज्यातील खाण उद्योग बंद पडला. गोव्यातील राजकारणावर प्रामुख्याने खाण उद्योगाचा वरचष्मा. खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, परंतु हाच मुद्दा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचा ठरण्याची चिन्हे आहेत.

२००९ बलाबल
  एकूण जागा २
०१ काँग्रेस</p>

०१ भाजप