उत्तर गोव्यात भाजपने यंदाही श्रीपाद नाईक यांनाच उमेदवारी दिली असून काँग्रेसने रवी नाईक यांना त्यांच्याविरोधात उतरविले आहे. आम आदमी पार्टीने दत्ताराम नाईक, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सुहास नाईक यांना उमेदवारी दिली आहे. गोवा लोकशाही मंचातर्फे दयानंद नार्वेकर हे लोकांकडे कौल मागत आहेत.
याचे मुख्य कारण म्हणजे खाण उद्योग बंद पडल्यामुळे शेकडो कामगार बेकारीच्या खाईत लोटले गेले असून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मोठा आहे आणि नेमकी हीच बाब सत्ताधाऱ्यांना अडचणीची ठरू शकते. खाणी बंद पडण्यास कोण जबाबदार आहे, या मुद्दय़ावरून मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची वक्तव्ये नेहमीच संदिग्ध राहिली असल्याचा आरोप विरोधक करतात. राज्याला विशेष दर्जा देण्याचा मुद्दाही कायम ‘इश्यू’ ठरला आहे. याशिवाय विद्यमान दाभोळी विमानतळ बंद करून तो मोपा येथे हलविण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. हे विषय तसे राष्ट्रीय स्तरावरील असले तरी त्यास स्थानिक राजकारणाचाही पदर असल्यामुळे भाजपसाठी काहीसे त्रासदायक ठरण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसच्या तंबूतही फारसे आशादायक चित्र नाही. रवी नाईक आणि त्यांच्या चिरंजीवांचा अमली पदार्थाच्या व्यवहारात हात असल्याचा मुद्दा ऐन निवडणुकीच्या तोंडावर ऐरणीवर आला आहे, तर गोव्याच्या किनारपट्टीवरील भाजपच्या आमदारांचेही हात अमली पदार्थाच्या व्यवहाराने बरबटलेले असल्याचा आरोप करून काँग्रेसने तसेच प्रत्युत्तर दिले आहे. दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचे चिरंजीव शालोम सार्दिन यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला असून चर्चिल आलेमाव यांनी तृणमूल काँग्रेसच्या वतीने दक्षिण गोव्यातूनच अर्ज भरल्यामुळे आलेक्स लॉरेन्स यांच्यासमोरील आव्हाने वाढली आहेत. विशेष म्हणजे आलेमाव यांची कन्या वालंका आलेमाव या गोवा युवा काँग्रेसच्या अजूनही नेत्या आहेत. मात्र काँग्रेसच्या प्रचारात त्यांचा तसा सक्रिय सहभाग दिसत नाही. गोवा विकास पार्टीचे सर्वेसर्वा मिकी पाशेको यांनी ‘काँग्रेसला धडा शिकविण्यासाठी आपण भाजपला पाठबळ’ देत असल्याचे जाहीर केले. गेल्या पाच वर्षांत राष्ट्रीय स्तरावरील प्रचंड भ्रष्टाचारामुळे काँग्रेसवर जनतेची नाराजी असली तरी गोव्यातही गेली दोन वर्षे भाजप सत्तेवर असल्यामुळे अशा संमिश्र वातावरणात गोव्यातील मतदार येत्या १२ एप्रिल रोजी कोणाला आपला कौल देतील, याचे औत्सुक्य सर्वानाच आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा