सातत्याने काँग्रेसच्या पाठीशी राहिलेल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात रविवारी आयोजित सभेला प्रकृती अस्वस्थतेमुळे  सोनिया गांधी उपस्थित राहू न शकल्याने हजारोंच्या संख्येने जमलेले काँग्रेस समर्थक निराश झाले. प्रत्येक लोकसभा निवडणुकीत गांधी घराण्यातील सदस्य नंदुरबारमध्ये प्रचारासाठी येत असतात. परंतु त्यात प्रथमच खंड पडला. या समर्थकांची समजूत काढत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गुलाम नबी आझाद यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर चौफेर टिकास्त्र सोडत उपस्थित कार्यकर्त्यांंमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला.या मतदारसंघातून सलग नऊवेळा काँग्रेसकडून विजय मिळविणारे माणिकराव गावित हे विक्रमासाठी उत्सुक आहेत. माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची मुलगी हीना यांनी महायुतीतर्फे उमेदवारी करत त्यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे.