‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’मध्ये ज्या प्रकारे लुटुपुटुच्या लढाया असतात, तशाच लढाया काँग्रेस, समाजवादी पक्ष (सपा) आणि बहुजन समाज पक्ष (बसपा) हे पक्ष उत्तर प्रदेशात लढत आहेत. आम्ही एकमेकांचे विरोधक असल्याचे हे पक्ष दाखवतात, मात्र केंद्रात सत्ता मिळवण्यासाठी ते एकत्र येतात, अशी टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केली.
मोदी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनाही लक्ष्य केले. हे दोनही नेते मतपेढीचे राजकारण करत असून, धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुस्लिमांची दिशाभूल करत आहेत. लखनऊमध्ये एकमेकांविरोधात उमेदवार उभे करून आमच्यात लढाई असल्याचे ते दाखवत आहेत. मात्र केंद्रातील सत्ता मिळवण्यासाठी हे तीनही पक्ष एकमेकांना पाठिंबा देतात. त्यामुळे आता बदल घडवण्याची वेळ आलेली आहे, असे मोदी म्हणाले. या पक्षांच्या राजकारणामुळे तुम्ही त्रासलेले आहात, पण तुम्हाला विश्वास देतो की, असा त्रास तुमच्या मुलाबाळांना सहन करावा लागणार नाही, असे सांगून मोदी यांनी मतदारांना भावनिक साद घातली. लोकसभा निवडणुकीनंतर सीबीआयही यूपीएचे सरकार वाचवू शकणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
‘‘जर शिक्षण कमकुवत असेल, तर विद्यार्थ्यांना शाळेत यावेसेही वाटणार नाही. त्याप्रकारेच केंद्रातही मजबूत सरकार निवडून देण्याची गरज आहे. भाजपला या निवडणुकीत ३००पेक्षा अधिक जागा मिळतील आणि ते केंद्रात मजबूत सरकार देणार आहे,’’ असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

Story img Loader