लोकसभेच्या नगर मतदारसंघातील लढत दुरंगी होणार की तिरंगी लढत हाच गेले वर्षभर उत्सुकतेचा विषय होता. राष्ट्रवादीने या मतदारसंघात माजी आमदार राजीव राजळे यांना उमेदवारी देऊन तिरंगी लढतीचा मुद्दा निकाली काढला. आता भाजपचे खासदार दिलीप गांधी यांची कसोटी लागणार आहे. या मतदारसंघात एकाआड दोनदा विजय नोंदवत त्यांनी काँग्रेसच्या विशेषत: राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले हे खरे, मात्र यंदा प्रथमच ते सरळ लढतीला सामोरे जात आहेत. दुरंगी लढतीचा ते कसा सामना करतात यावरच त्यांच्यासह पक्षाचे भवितव्य ठरेल.
मागच्या तीनपैकी दोन निवडणुका भाजपने, म्हणजे दिलीप गांधी यांनीच जिंकल्या. १९९९ ची निवडणूक दोन्ही काँग्रेसने स्वबळावर लढवली होती, त्यामुळे तिरंगी झाली. २००९ ला या मतदारसंघात पुन्हा तिंरगी निवडणूक झाली. यात भाजपचे गांधी दुसऱ्यांदा विजयी झाले. गेल्यावेळचे काँग्रेसचे बंडखोर राजळे हेच आता आघाडीचे उमेदवार आहेत.
यंदा गांधी, राजळे, अभिनेत्री दिपाली सय्यद (आम आदमी पक्ष), माजी न्यायमुर्ती बी. जीे. कोळसे यांच्यासह १३ उमेदवार रिंगणात असले तरी भाजपचे गांधी आणि राष्ट्रवादीचे राजळे यांच्यातच सरळ लढत आहे. मागच्या तीन निवडणुकांची आकडेवारी लक्षात घेता भाजपचा येथील मतांचा गठ्ठा तीन लाखांच्या आसपास आहे. तिरंगी निवडणुकीत भाजपची सरशी होते. मात्र दुरंगी लढतीत निवडून येण्यास पाच लाखांच्या जवळपास मते लागतील. या मतदारसंघातील सहापैकी चार विधानसभा मतदारसंघ युतीकडे आहेत. ही गांधी यांची जमेची बाजू आहे, मात्र गटबाजीने ग्रासलेली पक्ष संघटना आणि दुरंगी लढतीचे आव्हान अशा दोन गोष्टी गांधी यांच्या दृष्टीने अडचणीच्या आहेत. स्वत: गांधीनाच पक्षात आणि शिवसेनेतही विरोध आहे. यातूनच पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत प्रवेश केला. तरीही मोदींचा करीश्मा आणि आमदार शिवाजी कर्डिले यांच्या रूपाने पक्षाचा वाढलेला आणखी एक आमदार यावर मतांची तूट भरून काढण्याची निती आहे.
राजळे यांना जाहीर विरोध नसला तरी त्यांनाही अंतर्गत धुसफूशीचा सामना करावा लागतो आहे, मात्र पवार काका-पुतण्यांनीच कंबर कसल्याने ही धुसफूस काहीशी थंडावली आहे. शिवाय दुरंगी लढतीने मराठा मतांचे ध्रुवीकरण थांबेल. गेल्या वेळपासून त्यांनी मतदारसंघात संपर्क निर्माण केला असून तो टिकवण्यात ते यशस्वी झाले आहेत. नातेसंबंध, घराण्याची पाश्र्वभूमी व आमदार म्हणून केलेले धडाकेबाज काम या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. काँग्रेसमधील त्यांचे मामा महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा गट प्रचारात सक्रिय झाला असला तरी काँग्रेसचाच दुसरा विखे गट कोणती भूमिका घेतो याकडे सर्वाचे लक्ष आहेच. सद्यस्थितीत कोळसे यांच्या उमेदवारीमुळे राजकीय वर्तुळात सतर्कता व्यक्त होऊ लागली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा