राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सरकारमधील निर्णय प्रक्रियेपासून जागावाटपापर्यंत राष्ट्रवादीने दबावतंत्राचा वापर सुरू केला असला तरी नेहमीप्रमाणेच दिल्लीतील काँग्रेस नेतृत्व दबावतंत्र मान्य करण्याची शक्यता अधिक आहे. स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्यापासून मराठा व मुस्लिम आरक्षण तसेच भारनियमन रद्द करणे यासारखे काही महत्त्वाचे निर्णय लवकर घ्यावे, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. तसेच जागावाटपाच्या वाटाघाटी लवकर सुरू व्हाव्यात आणि जागा वाढवून द्याव्यात, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबद्दल राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचे आक्षेप असून, निर्णय प्रक्रिया लवकर होत नाही, असा राष्ट्रवादीचा तक्रारीचा सूर आहे. जागावाटपात राष्ट्रवादीला जागा वाढवून हव्या आहेत. गेल्या वेळी काँग्रेसने १७० तर राष्ट्रवादीने ११३ जागा लढविल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत १५ ते २० अधिक जागा मिळविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. काँग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्वाने नेहमीच पवार यांच्यापुढे सपशेल माघार घेतल्याची उदाहरणे आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडी कायम राहिल्यास राष्ट्रवादीच्या वाटय़ाला नक्कीच जास्त जागा येण्याची चिन्हे आहेत.
अशोक चव्हाण व माणिकराव ठाकरे यांची भेट
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात वातावरण तापले असतानाच अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली. दोन्ही मुख्यमंत्री विरोधक एकत्र आल्याने वेगळी चर्चा सुरू झाली. पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी गेलो होतो, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. तर नांदेड जिल्ह्यातील संघटनात्मक बाबींबाबत चर्चा करण्याकरिता अशोकराव भेट घेण्यासाठी आले होते, अशी माहिती माणिकराव ठाकरे यांनी दिली.

Story img Loader