काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत राज्यातील सात मतदारसंघांतील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असली तरी अशोक चव्हाण आणि सुरेश कलमाडी यांच्या आग्रहामुळे वादग्रस्त ठरलेल्या नांदेड आणि पुण्यातील उमेदवारांचा निर्णय अद्यापही रखडला आहे. भिवंडीचे सुरेश टावरे आणि गडचिरोलीचे मारोतराव कोवासे या दोन विद्यमान खासदारांना पक्षाने उमेदवारी नाकारली आहे.
राज्यात काँग्रेसच्या वाटय़ाला २७ मतदारसंघ आले असून, यापैकी पहिल्या यादीत १३ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. दुसऱ्या यादीत सात मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर झाली असली तरी सात मतदारसंघातील नावे निश्चित करताना गटबाजी रोखण्याचे आव्हान काँग्रेस नेत्यांसमोर आहे. यवतमाळ मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुलाच्या नावासाठी आग्रह धरला आहे. पुण्यात सुरेश कलमाडी स्वत: किंवा पत्नीसाठी आग्रही आहेत. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्याबाबत पक्षात दोन मतप्रवाह आहेत. चंद्रपूरमध्ये सांस्कतिकमंत्री संजय देवतळे यांना उमेदवारी देण्याची योजना असली तरी नरेश पुंगलिया यांनी जोर लावल्याने हा मतदारसंघ रखडला आहे. पालघरमध्ये हितेंद्र ठाकूर चिन्हावर लढण्यास तयार नाहीत. तरीही प्रयत्न सुरू असल्याने या मतदारसंघातील उमेदवारी जाहीर करण्यात आलेला नाही. औरंगाबादमध्ये गटबाजीतून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. या पाश्र्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांना उभे करून मध्यमार्ग काढण्याचा प्रयत्न आहे.  
दोन खासदारांना घरी बसविले
भिंवडीचे सुरेश टावरे यांना उमेदवारी नाकारून पक्षाने अलीकडेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली. टावरे यांच्या निष्क्रिय खासदार म्हणून शिक्का बसला होता. गडचिरोली-चिमूरमध्ये उमेदवार बदलला तरच काम करू, असा पवित्रा विजय वडेट्टीवार आणि अन्य नेत्यांनी घेतल्याने मारोतराव कोवासे यांच्याऐवजी गडचिरोलीचे आमदार डॉ. नामदेव उसंडी यांना उमेदवारी देण्यात आली. दत्ता मेघे यांनी स्वत:हून न लढण्याचे जाहीर केले होते. त्याऐवजी मतदान पद्धतीतून निवडून आलेले त्यांचे पुत्र सागर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
अकोल्यात मुस्लिम उमेदवार
राज्यातून एक तरी मुस्लिम उमेदवार उभा करताना कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी द्यायची हा प्रश्न पडला होता. त्यातूनच अकोल्यातून हिदायत पटेल यांना उमेदवारी देण्यात आली. रायगडच्या बदल्यात हिंगोलीची जागा पदरात पाडून घेतलेल्या काँग्रेसने राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि अ. भा. युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव यांचे नाव जाहीर करण्यात आले.
जालन्यातून माजी आमदार केशवराव औताडे यांचे पुत्र विलास यांना उमेदवारी देण्यात आली. औरंगाबाद महापालिका निवडणुकीत दोनदा पराभूत झालेल्या विलास यांचा निभाव कसा लागणार, असा प्रश्न काँग्रेस नेत्यांना पडला आहे. राष्ट्रवादीने सोडलेल्या हातकणंगले मतदारसंघातून माजी मंत्री व ज्येष्ठ नेते कलाप्पाण्णा आवाडे यांना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी देण्यात आली.
जातीचे समीकरण साधले
उमेदवारांची यादी तयार करताना काँग्रेसने मुस्लिम, दलित, इतर मागासवर्गीय, मराठा, उत्तर भारतीय अशी सर्व समीकरणे साधली आहेत. उर्वरित सात नावे पुढील आठवडय़ात जाहीर केली जातील.
बन्सल यांना उमेदवारी चव्हाणांचे काय होणार ?

रेल्वे बोर्डाचे सदस्य म्हणून नेमणूक करण्याकरिता लाच घेताना भाचा पकडला गेल्याने रेल्वे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले पवनकुमार बन्सल यांना चंदिगडमधून पुन्हा उमेदवारी देण्यात आल्याने काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी अशोक चव्हाण यांच्याबाबत कोणता निर्णय घेतात याकडे राज्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. बन्सल यांच्या भाच्याला पकडण्यात आले असले तरी स्वत: बन्सल यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नव्हता. पक्षाने संशयाचा फायदा देत बन्सल यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. बन्सल हे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निकटवर्तीय मानले जातात. अशोक चव्हाण यांच्या विरोधात ‘आदर्श’ प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयात अजूनही प्रकरण प्रलंबित आहे. सुरेश कलमाडी हे तर तुरुंगाची हवा खाऊन आले आहेत. ही सारी पाश्र्वभूमी लक्षात घेता अशोक चव्हाण यांना उमेदवारी देताना पक्षाला विचार करावा लागणार आहे. भाजपने कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना उमेदवारी दिल्याने अशोक चव्हाण यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
काँग्रेस उमेदवार

भिवंडी-विश्वनाथ पाटील, गडचिरोली-चिमूर-नामदेव उसंडी,वर्धा-सागर मेघे, अकोला-हिदायत पटेल, हिंगोली-राजीव सातव, जालना-विलास औताडे, इचलकरंजी-कल्लाप्पा आवाडे