केंद्रातील सत्ताधारी काँग्रेस पक्षाने शनिवारी १९४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यादीत महाराष्ट्रातील १३ जणांचा समावेश असला तरी त्यात विद्यमान ११ खासदारांचीच नावे आहेत. मुंबईतील सर्वच खासदारांना पक्षाने पुन्हा लोकसभेचे तिकीट दिले आहे, हे विशेष. मात्र, असे असले तरी कालपरवाच राहुल यांच्याबरोबर व्यासपीठावर दिसलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीबाबत काँग्रेसमध्ये अद्याप संभ्रम असल्याचेच निदर्शनास आले.
निवृत्त व्हायचंय मला..
काँग्रेसने शनिवारी जाहीर केलेल्या यादीत राज्यातील विद्यमान १७ पैकी ११ खासदारांना पुन्हा संधी दिली आहे. शिवसेनेतून काँग्रेसच्या गोटात सामील झालेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांना शिर्डीतून तर धुळे लोकसभा मतदारसंघातून अमरिश पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईत काँग्रेसचा उत्तर भारतीय चेहरा असलेल्या संजय निरूपम उत्तर मुंबईतून पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरवणार आहेत. नागपूरमधून विलास मुत्तेमवार यांना उमेदवारी घोषीत झाली आहे. त्यांची लढत भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याशी आहे. विशेष म्हणजे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांचा तीव्र विरोध असतानाही पक्षाने एकनाथ गायकवाड यांनाच उमेदवारी दिली. मुंबई उत्तर पश्चिममधून गुरुदास कामत, उत्तर मध्य मतदारसंघातून प्रिया दत्त तर दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा याच चेहऱ्यांना काँग्रेसने संधी दिली आहे.
पुण्याचा निर्णय नाहीच
दरम्यान, पुणे, यवतमाळ, नांदेड, हिंगोलीसह अन्य मतदारसंघांचा निर्णय झाला नसल्याचे समजते. पुण्यासाठी इच्च्छुक उमेदवारांपैकी आमदार शरद रणपिसे गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. उर्वरित मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा पुढील आठवडय़ात होण्याची शक्यता पक्षसूत्रांनी व्यक्त केली. मुंबईतील एकही उमेदवार बदलण्याचा धोका काँग्रेसने पत्करलेला नाही. नंदुरबारमधून सलग नऊ वेळा जिंकण्याचा विक्रम करणारे माणिकराव गावित, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (सोलापूर) यांचाही यादीत समावेश आहे. रत्नागिरी-सिंधूदुर्गमधून निलेश राणे, सांगलीतून प्रतीक पाटील तर रामटेकमधून मुकुल वासनिक यांचीही नावे अपेक्षेप्रमाणे यादीत आहेत.
माणिकरावांचा आग्रह
यवतमाळ- वाशिम, पुणे, हिंगोली मतदारसंघासाठी संभाव्य उमेदवारांच्या नावावर बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील दिवसभर नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यवतमाळमधून स्वत प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उत्सुक आहेत. स्वतला न मिळाल्यास मुलाला उमेदवारी द्या, असा त्यांचा आग्रह आहे. परंतु पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरे यांना विरोध दर्शवला असल्याचे समजते.
.. तर चव्हाण का नको?
भाजपने कर्नाटकचे वादग्रस्त माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना शिमोगा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी जाहीर केली. यामुळेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नांदेडमधून उमेदवारी देण्यात यावी, असा मतप्रवाह पक्षात पुढे आला आहे.
अशोक चव्हाण यांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा
मुंबई भेटीच्या वेळी राहुल गांधी यांना अशोकरावांच्या उमेदवारीबाबत विचारले असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले होते. चव्हाण यांच्या उमेदवारीबाबत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर शेवटच्या टप्प्याची यादी तयार करताना निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. पुण्यातून पत्नीला उमेदवारी देण्याची सुरेश कलमाडी यांची मागणी असली तरी पक्षनेत्यांची त्यास तयारी नाही. गडचिरोलीचे विद्यमान खासदार मारोतीराव कोवासे यांना पुन्हा संधी दिली जाणार नाही, अशी शक्यता आहे.
नीलेकणी बंगळुरूतून
सोनिया-राहुल गांधी यांना अनुक्रमे रायबरेली व अमेठीतून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर ‘आधार’ कार्ड संकल्पनेचे प्रवर्तक नंदन नीलेकणी यांना दक्षिण बंगळुरूतून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. यादीत केंद्रीय मंत्री ज्योतिरादीत्य शिंदे (गुणा – मध्य प्रदेश), कमलनाथ ( छिंदवाडा), चरणदास महंत (कोरबा), नवीन जिंदल, आरपीएन सिंह (कुशीनगर – उत्तर प्रदेश) या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. यात २८ महिला उमेदवारांचा समावेश आहे. कोळसा खाण वितरण गैरव्यवहारामुळे राजकीय संकटात सापडलेल्या श्रीप्रकाश जायसवाल (कानपूर) यांना उमेदवारी देवून पक्षाने मोठा दिलासा दिला आहे.
भिवंडीचा निर्णय रखडला
राहुल गांधी यांची दोनच दिवसांपूर्वी भिवंडीच जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र भिवंडीचे विद्यमान खासदार सुरेश टावरे यांना पुन्हा उमेदवारी देण्यास विरोध आहे. निष्क्रिय खासदार म्हणून त्यांच्याऐवजी मुस्लिम नेत्याला संधी द्यावी, असा प्रस्ताव आहे. राज्यातून मुस्लिम उमेदवाराला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी द्यायची, हा प्रश्न पक्षापुढे आहे. यामुळेच भिवंडीचा निर्णय घेण्यात आलेला नाही, असे सांगण्यात आले.
काँग्रेस- टीआरसी आघाडीबाबत पुढील आठवडय़ात चर्चा
काँग्रेसचे तेच ते..
केंद्रातील सत्ताधारी काँग्रेस पक्षाने शनिवारी १९४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यादीत महाराष्ट्रातील १३ जणांचा समावेश असला तरी त्यात विद्यमान ११ खासदारांचीच नावे आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-03-2014 at 04:35 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress first list cricketer mohd kaif nandan nilekani ravi kishen among 194 candidates for lok sabha polls