नोएडातील गौतम बुद्ध नगर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रमेश चंद तोमर यांनी गुरुवारी सकाळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली आहे. काँग्रेस उमेदवाराने भाजप प्रवेश करण्याची महिनाभरातली ही दुसरी घटना आहे. तोमर हे पाच वर्षांपूर्वी भाजपातच होते आणि लगतच्या गाझियाबादमध्ये भाजपतर्फे तीन वेळा ते खासदार म्हणून निवडून आले होते. त्यामुळे तोमर यांच्या पक्षप्रवेशाने भाजपला गौतम बुद्ध नगर तसेच गाझियाबादमध्ये मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
गौतम बुद्ध नगरमध्ये १० एप्रिलला निवडणूक होणार आहे. तेथे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदतही संपली आहे. त्यामुळे आपला उमेदवारच विरोधी पक्षात गेल्याने काँग्रेसवर मोठीच नामुष्की ओढवली आहे. गेल्या महिन्यात मध्य प्रदेशातील भिंड येथे काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली असतानाही निवृत्त प्रशासकीय अधिकारी भागीरथ प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.तोमर हे भाजपात जाणार, अशी चर्चा सुरू होताच त्यांनी ही शक्यता फेटाळली होती. आपल्या भाजप प्रवेशाची आवई विरोधकच उठवत असून त्यामागे मोठा कट आहे, असा आरोपही बुधवारी त्यांनी केला होता. प्रत्यक्षात दिल्लीत येताच त्यांनी थेट पक्षप्रवेश केला.

राजकीय समीकरण
तोमर हे गाझियाबादमधून तीन वेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाने म्हणूनच गौतम बुद्ध नगर आणि गाझियाबाद या दोन्ही मतदारसंघांत भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे. तोमर यांच्या भाजप प्रवेशाने गौतम बुद्ध नगरातील चार लाख राजपूत मते भाजपच्या पारडय़ात पडण्याची शक्यता आहे. गाझियाबादमध्ये भाजपतर्फे जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंग उभे आहेत. त्यांनाही तोमर यांच्यामुळे तीन लाख मते मिळण्याची शक्यता आहे.

नोएडा टाळले!
भाजपचे नरेंद्र मोदी यांनी  कुरुक्षेत्र, गाझियाबाद आणि गुडगाव येथील प्रचारसभा घेतल्या. गौतमबुद्ध नगर येथेही मोदींनी पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार केला. मात्र नोएडाला जाण्याचे त्यांनी टाळले. नोएडाला जे भेट देतात, त्यांना राजकारणात धक्का बसतो असा एक समज आहे. त्यामुळेच मोदींनी नोएडाला जाणे टाळले असावे अशी चर्चा आहे.