हरयाणातील मतदारांचे प्रामुख्याने दोन गट ‘राजकीयदृष्टय़ा’ पडतात. एक जाट आणि दुसरा म्हणजे ‘जाट नसलेले’. या राज्याची सर्व समीकरणे या वर्गीकरणाभोवतीच आजवर फिरत आली. मात्र दिल्ली विधानसभेच्या निकालांनंतर हरयाणाचा चेहेरा मोहरा बदलणार हे स्पष्ट झाले. मूळचे हरयाणाचे असलेले आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल आणि योगेंद्र यादव यांनी हरयाणातील प्रचलित ‘जातीविभाजनावर आधारित’ राजकारणाला छेद देत ‘समस्या आधारित’ मुद्यांवर प्रचारास सुरुवात केली. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेससमोर खरा पेच उभा राहिल्याचे प्राथमिक चित्र आहे. जाट आणि जाट नसलेले इतर यांचा विश्वास संपादन करणे, येथील दलितांमध्ये फोफावलेल्या ‘ऑनर किलिंग’सारख्या प्रथांचा नायनाट करणे, जाट आणि यादव यांच्यातील द्वंद्व समेटाने सोडविता येणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे, खाप पंचायतींच्या प्रभावापलिकडे विचार करण्यास मतदारांना भाग पाडणे अशा स्वरुपाची आव्हाने आम आदमी पक्षासमोर आहेत.
काँग्रेससमोरील वाढते पेच
सत्ताधारी काँग्रेसचे भूपिंदर सिंग हूड्डा यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि कुमारी सेल्जा यांच्याविरोधात भ्रष्टाचारामुळे जनमानस संतप्त झाले आहे. प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याच्या आदल्याच संध्याकाळी हूड्डा सरकारने अनेक अनियमित बांधकामे नियमित करून तसेच जाटांना आरक्षण जाहीर करून जनमत आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला असला तरीही राज्यातील शिक्षणाची घसरती स्थिती, स्त्रियांचे समाजातील घसरते स्थान, शेतकऱ्यांची नाराजी, कृषीमालाला रास्त भाव मिळण्याचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न अशा प्रश्नांवर सरकारकडे उत्तरे नाहीत. अशोक खेमका यांनी रॉबर्ट वडेरा आणि डीएलएफ यांच्या संशयास्पद व्यवहारांवर टाकलेला प्रकाश काँग्रेससाठी घातक ठरू शकतो़ हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौताला यांना शिक्षक भरती घोटाळ्यात झालेली शिक्षा लक्षात घेता येथील एक प्रमुख पक्ष ‘भारतीय राष्ट्रीय लोक दला’ची परिस्थितीही आश्वासक नाही़
त्यातच हरयाणात भाजपकडेही ‘नावाजलेले’ उमेदवार नाहीत. त्यामुळे पक्षाने ‘आयारामा’ना तिकिटे देण्याचे धोरण अवलंबिले आहे. भूपिंदर सिंग हुड्डा यांच्याशी सुत जुळू न शकणारे काँग्रेसचे राव इंद्रजित सिंग यांना पक्षाने गुरगांवमधून उमेदवारी दिली आहे. राज्यातील १० पैकी ८ मतदारसंघात भाजपतर्फे उमेदवार देण्यात येणार असून धरमवीर सिंग व रमेश कौशिक या काँग्रेसमधून आलेल्यांनाही उमेदवारी देण्यात आली आह़े
लक्षणीय लढती
हरयाणात फरिदाबाद, अंबाला आणि कर्नाल या मतदारसंघात होणाऱ्या लढती चुरशीच्या ठरतील असा अंदाज आहे. भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेले राव इंदरजित सिंग आणि गुरगांवमधून ‘आप’तर्फे उभे असलेले योगेंद्र यादव यांच्यातील लढतीचा निकालही लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत.