आपले शिष्य सुनील तटकरे यांना विरोध करण्यासाठीच शेकापच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शविण्याची कृती माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांना महागात पडण्याची चिन्हे आहेत. प्रदेश काँग्रेसने अंतुले यांच्या विरोधातील अहवाल दिल्लीला पाठविला आहे. 

रायगड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे हे एकेकाळचे अंतुले यांचे शिष्य. पुढे अंतुले आणि तटकरे यांचे बिनसले आणि मंत्रिपदाचा उपयोग करीत रायगड जिल्ह्यात तटकरे यांनी स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित केले. रायगड जिल्ह्यातील अंतुले समर्थकांना राजकीयदृष्टय़ा संपविण्यावर तटकरे यांनी भर दिला. यंदा रायगड मतदारसंघ काँग्रेसने राष्ट्रवादीसाठी सोडल्याने अंतुले आधीच संतप्त झाले होते. अंतुले आणि शेकापचे जुने संबंध सर्वश्रूतच आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात अंतुले आणि शेकाप यांचा कायम वाद राहिला. मात्र तटकरे यांना डिवचण्याकरिताच शेकापने पाठिंबा दिलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार अपक्ष रमेश कदम यांना अंतुले यांनी आशीर्वाद दिला. तसेच मावळमधील शेकाप पुरस्कृत लक्ष्मण जगताप यांनाही पाठिंबा दर्शविला.
आघाडीच्या विरोधातील उमेदवाराला पाठिंबा देणे केव्हाही चुकीचे असून, अंतुले यांच्या या साऱ्या कृतीचा अहवाल दिल्लीला पाठविण्यात आला आहे. पक्षाच्या केंद्रीय नेत्यांकडून अंतुले यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. इंदिरा गांधी यांचे अत्यंत निकट मानले जाणारे तसेच काँग्रेसच्या राजकारणात एकेकाळी दबदबा असलेल्या अंतुले यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, अशी शक्यता आहे. उमेदवारी जाहीर झाल्यावर आशीर्वादाकरिता सुनील तटकरे यांनी अंतुले यांच्या भेटीची तयारी दर्शविली होती. वेळ मागितली असता अंतुले यांच्याकडून प्रतिसाद देण्यात आला नाही. पण शेकापच्या उमेदवारांना भेटीसाठी वेळ दिला, असे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले.
रायगड मतदारसंघावरून अंतुले संतप्त झाले असतानाच पुणे मतदारसंघात डावलले गेल्याने सुरेश कलमाडी हे काँग्रेसला धडा शिकविण्याचा प्रयत्न करतील, अशी आटकळ बांधली जात होती. पण कलमाडी हे टोकाची भूमिका घेणार नाहीत, असे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले.